ड्रोन – कल्पनाविश्वातून वास्तवात उतरलेलं गूढ!

>> अतुल कहाते

ड्रोनचा वापर अनेक उपयुक्त कारणांसाठी होऊ शकतो असं म्हटलं जात असल्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो याकडे आपण वळलं पाहिजे. म्हणजेच फक्त काहीतरी गूढ, मनोरंजक असं आता ड्रोनचं स्वरूप राहिलेलं नसून ड्रोन आता विज्ञान कथांच्या पानांमधून बाहेर पडून प्रत्यक्षातल्या जगात मुक्त संचार करायला लागलेलं असल्यामुळे त्याच्या वास्तवाची आपण आता दखल घेतली पाहिजे.

निरनिराळ्या ठिकाणी वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू झालेलाच आहे. ऍमेझॉन कंपनीनं प्रायोगिक तत्त्वांवर आपल्या ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचे प्रयोग सुरू केल्यामुळे नजीकच्या भविष्यात कदाचित ऍमेझॉनच्या ‘डिलिव्हरी बॉईज’ची जागा मोठय़ा प्रमाणावर ड्रोन घेतील असं म्हटलं जातं. याखेरीज उपाहारगृहातून अन्न मागवण्याबरोबरच घरबसल्या जवळपास कुठलीही गोष्ट मागवणं लोकांना शक्य होईल असाही अंदाज आहे. तसंच कुरियर कंपन्यांना तातडीनं पोहोचविण्यासाठीची पार्सल सेवा अजून सक्षम करता येईल. अर्थात आपल्यालाच आपलं स्वतःचं पार्सल कुरियर कंपनी टाळून ड्रोनद्वारे पाठवता येईल का? अशा प्रकारचे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. कारण यासंबंधीची नियमावली आणि आचारसंहिता काय योग्य ते ठरवेल.

हवेत उडणाऱया गूढ तबकडय़ांविषयी पूर्वीपासून अनेक लेखकांनी कल्पनेच्या भराऱया मारलेल्या आहेत. विज्ञान कथालेखकांनी त्याविषयी बरंच लिहिलेलं तर आहेच; पण लहान मुलांच्या गोष्टींमध्ये आणि परिकथांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या वर्णनांनी बहार आणलेली आहे. यात परग्रहांवरून पृथ्वीवर येऊ पाहणाऱया सजीवांच्या प्रवासासाठीच्या तबकडय़ांपासून पृथ्वीवर नजर ठेवण्यासाठी परग्रहवासीयांनी सोडलेल्या तबकडय़ांचा समावेश आहे. अधूनमधून जगाच्या पाठीवर काही ठिकाणी लोकांना हवेत उडत असलेली तबकडी दिसली असल्याच्या बातम्याही येत असतात. यामधला फोलपणा ठाऊक असूनही या गूढाविषयीचं आकर्षण काही कमी झालेलं नाही. ‘स्टार ट्रेक’ सारख्या मालिकांनी तर उडत्या तबकडय़ांना आणखी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

या पार्श्वभूमीवर ‘ड्रोन’ या आधुनिक प्रकारच्या उडत्या तबकडय़ांसदृश प्रकारानं सगळीकडे कुतूहलाचं वातावरण निर्माण केलं आहे. आपल्या देशातही आता अनेक ठिकाणी अशी ड्रोन्स आता हवेत तरंगताना किंवा छोटेखानी प्रवास करताना दिसतात. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेक जण आपल्या हातामधल्या रिमोट कंट्रोलद्वारे ड्रोनला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात.

अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर ड्रोन म्हणजे हवेत उडू शकणारं चालकविरहित वाहन असतं. तांत्रिक भाषेत यालाच ‘अनमॅन्ड एरियल व्हेईकल (यूएव्ही)’ असं म्हणतात. हवेत उडू शकणारं कुठलंही यंत्र बनवायचं असेल तर मुळात त्याचं वजन शक्य तितकं कमी असणं गरजेचं असतं अन्यथा त्याच्या हवेतल्या प्रवासावर भौतिक शास्त्रामधल्या मूलभूत संकल्पनांनुसार निर्बंध येऊ शकतात. साहजिकच ड्रोनची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱया पदार्थांचे गुणधर्मही याच्याशी सुसंगत असतात. ड्रोन हे जणू एखाद्या अगदी छोटय़ा हेलिकॉप्टरसारखं दिसत असलं तरी त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या तांत्रिक गोष्टी असतात. ड्रोन चालकविरहित असावं यासाठी त्यामध्ये इन्फ्रारेड कॅमेरा, जीपीएस, लेझर अशा सगळ्या यंत्रणा असतात. अर्थात ड्रोनचं कामकाज मुख्यत्वे जमिनीवर असलेल्या मानवी संचालकाद्वारेच चालतं. कृत्रिम बुद्धिमत्तेमधल्या सततच्या सुधारणांमुळे यात बदल होऊन नजीकच्या काळात ड्रोनमध्ये अधिकाधिक स्वयंचलन करण्याची सोय होऊ शकेल आणि काही काळानंतर ड्रोन जवळपास पूर्णपणे स्वतःच प्रवासासंबंधीचे सगळे निर्णय घेऊ शकेल असं मानलं जातं. ड्रोनच्या नाकासारख्या टोकेरी भागामध्ये त्याच्या ‘संवेदना टिपण्यासाठीची’ सगळी यंत्रणा बसवलेली असते. ड्रोनचे वेगवेगळे आकार असू शकतात. सर्वसाधारणपणे जास्त मोठय़ा आकाराचा ड्रोन लष्करी कारणांसाठी वापरला जातो.

आता मात्र लष्करी कारणांबरोबरच आपल्या सर्वसामान्य आयुष्याशी संबंधित असलेल्या गोष्टींसाठीही ड्रोनचा वापर करण्याविषयी खूप बोललं जातं. अर्थात त्याविषयीची नियमावली काटेकोर असणं अपेक्षितच आहे. कारण समजा कुणीही कुठेही आपल्याला हव्या त्या पद्धतीनं हवेत ड्रोन उडवायला लागलं तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. यात अपघातांपासून खासगी बाबींमधल्या हस्तक्षेपांपर्यंत असंख्य गोष्टींचा समावेश होतो. तसंच कुणावर लक्ष ठेवणं, पाळत ठेवणं असेही प्रकार घडू शकतात. आक्षेपार्ह पद्धतीनं चित्रण करणं, वैयक्तिक पातळीवर दृश्य पाठलाग करणं असे प्रकार त्यातून सहज शक्य होऊ शकतात. याविषयीची नियमावली खूप काळजी घेऊन तयार होणं अपेक्षित आहे. ती एकदा तयार झाली आणि सर्वमान्य ठरली तर मात्र ड्रोनचा उपयोग खरोखर अत्यंत हवाहवासा वाटू शकेल.

नव्या किंवा जुन्याही गृहप्रकल्पांची जाहिरात करत असताना गृहसंकुल विकासक किंवा घराचा मालक घर विकत घेऊ इच्छिणाऱया माणसाला त्याविषयी बरीच स्वप्नं दाखवतो. त्यावर विश्वास न बसल्यामुळे किंवा अतिरंजित वर्णनं केल्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात आधीपासूनच शंका निर्माण व्हायला लागतात. आता मात्र ड्रोनचा वापर करून संबंधित घर किंवा गृहसंकुल यांच्या जवळपासचा परिसर, प्रत्यक्ष गृहसंकुलाचा फेरफटका असं सगळं शक्य होईल असं मानलं जातं. म्हणजेच एकूण ते घर कसं आहे, त्याच्या नजीकचा परिसर कसा आहे हे सगळं ड्रोनमधला कॅमेरा टिपत राहील आणि घर विकत घेऊ शकणारा माणूस अगदी समाधान होईपर्यंत सगळ्या दिशांनी आणि कोनांमधून हे तपशील बघू शकेल.

अनेक प्रकारच्या पाहण्यांसाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो. पूर, आग, दुष्काळ, रस्ते किंवा पूल खचणं अशांसारख्या असंख्य दुर्घटनांच्या वेळी माणसाला तिथे थेट जाणं शक्य नसेल तर अगदी सूक्ष्म टेहळणीसाठी ड्रोनचा वापर उपयुक्त ठरू शकतो. इतकंच नव्हे, तर नुसतं वरवरचं नव्हे तर अगदी तपशीलवार विवेचन यातून होऊ शकतं. साहजिकच दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळण्यामधल्या दिरंगाईला यातून थोडाफार तरी प्रबंध करता येतो.

जमिनीची आर्द्रता, तिच्यामधल्या खतांचं प्रमाण, कीड आणि रोग पैदा करणारे घटक या सगळ्यांवर नजर टाकून त्याची तपशीलवार माहिती शेतकऱयांपर्यंत पोहोचवण्याचं काम ड्रोन करू शकतील असं म्हटलं जातं. यासंबंधीचे अनेक प्रयोग सध्या सुरू आहेत.
सुरक्षेशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींसाठी ड्रोन उपयुक्त आहेत. सीमेवर नजर ठेवणं, संभाव्य गुन्हेगारांवर पाळत ठेवणं, सामाजिक वातावरण बिघडलेलं असताना समाजकंटकांवर नजर ठेवणं, रस्त्यांवरच्या वाहतुकीवर नजर ठेवणं, रात्रीचा पहारा देणं अशी असंख्य कामं ड्रोनद्वारे करता येऊ शकतात. एका प्रकारे ‘हवेतला सीसीटीव्ही’ असल्यासारखा ड्रोन कार्यरत राहू शकतो.

लग्न समारंभ, सामने, इतर कार्यक्रम, करमणुकीचे मोठय़ा जागांमधले कार्यक्रम अशा ठिकाणी हवेतून टिपली जाणारी दृश्यं एकदम मनोहर वाटतात. अशा कामांसाठी ड्रोनचा खूप मोठय़ा प्रमाणावर वापर करता येतो. विमा कंपन्यांना तर याचा आणखी एका गोष्टीसाठी वापर करता येईल. अपघातांसारख्या दुर्घटनांनंतर वाहनांचं नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित वाहन चालकांना विमा कंपनीकडे धाव घ्यावी लागते. विमा कंपनी बऱयाच गोष्टींचा पडताळा करून मगच अशी नुकसानभरपाई देते. भविष्यकाळात अशा प्रकारचा पडताळा करण्यासाठी विमा कंपनीला अपघातस्थळी किंवा संबंधित वाहन चालकाकडे आपला माणूस पाठवणं गरजेचं नसेल. त्याऐवजी ड्रोनद्वारे सगळ्या बाजूंनी आणि प्रकारे अपघाताची बारीक तपासणी करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासंबंधीचा निर्णय विमा कंपनी घेऊ शकेल. यातून वेळेचीही प्रचंड बचत होईल.

याखेरीज इतरही अनेक बाबतींमध्ये ड्रोनचा वापर होऊ शकतो हे आपल्या लक्षात आलेलंच असेल. कदाचित यामुळे आपल्या आकाशामध्ये ड्रोनचा सुळसुळाट होईल की काय, अशीही भीती वाटते. ते कसं टाळायचं, त्यांचे अपघात कसे टाळायचे आणि या सगळ्यांचा वापर उपयुक्त कारणांसाठीच होईल यासाठी काय करायचं हे अतिशय क्लिष्ट प्रश्न आहेत. जागतिक पातळीवर त्याविषयी मंथन सुरू तर आहेच; पण आपल्यालाही त्यासंबंधी कृती करणं गरजेचं आहेच!

(लेखक माहिती तंत्रज्ञानाचे तज्ञ आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या