
>> आशुतोष बापट
सगळ्या जगाचे लक्ष लागून असलेले, खमेर स्थापत्याचा मेरुमणी असलेले, जागतिक वारसा म्हणून युनेस्कोचा दर्जा मिळालेले जगातील कोणत्याही धर्मीयामधील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेले ठिकाण म्हणजे हे अंकोरवाट मंदिर. संकल्पना, रचना, स्थापत्य या सगळ्याच बाबतीत अवाढव्य असे असलेले हे मंदिर. आग्नेयआशियामधील देशांमध्ये विस्तारलेल्या प्राचीन संस्कृतीचा हा वारसा.
हिंदुस्थानी संस्कृतीचा विस्तार हा हिंदुस्थानच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. आग्नेय आशियामधील देशांमध्ये झालेला हा विस्तार आजदेखील आपल्याला पाहता येतो, अनुभवता येतो. तिथल्या देशांमध्ये सध्या जरी इतर धर्मीय राजवटी असल्या तरीसुद्धा प्राचीन हिंदुस्थानी संस्कृतीची तिथे झालेली भरभराट आजसुद्धा मंदिरे आणि कला यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. श्रीलंका, ब्रह्मदेश (म्यानमार), इंडोनेशिया, मलेशिया, जावा-सुमात्रा-बाली बेटे, कंबोडिया आणि व्हिएतनाम इथपर्यंत प्राचीन हिंदुस्थानी संस्कृती बहरली होती, प्रस्थापित झालेली होती.
कंबोडिया हा त्यातलाच एक देश. प्राचीन काळी कंबुज नाव असलेल्या या देशाची सर्व अर्थसत्ता ही केवळ हिंदू मंदिरावर अवलंबून आहे. अंकोरवाट हे ते हिंदू मंदिर. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेले हे मंदिर, जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आहे आणि आपल्या दृष्टीने सर्वात अभिमानाची बाब म्हणजे ते विष्णूमंदिर आहे. आज जगभरातून कोट्यवधी पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी कंबोडियामध्ये येत असतात. दुर्दैवाने आपण हिंदुस्थानी मात्र त्या तुलनेने अगदीच कमी संख्येने तिथे जातो. त्याबद्दल फारशी माहिती नसणे हे जरी एक कारण असले तरीसुद्धा काही प्रमाणात अनास्था हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. थायलंड या देशी तिथले अनेक सुखोपभोग घेण्यासाठी हिंदुस्थानातून पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी जात असतात, परंतु थायलंडला लागूनच असलेल्या कंबोडियामध्ये त्यातले कितीसे लोक जात असतील हे एक कोडेच आहे. परंतु कंबोडिया हा खरोखर मुद्दाम वेळ काढून पाहण्यासारखा प्रदेश आहे. मंदिरांची भव्यता, विविधता आणि निसर्गाने नटलेला हा टुमदार देश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. पर्यटकस्नेही असा हा देश आहे. फक्त तांदूळ एवढ्याच पिकावर जगणाऱ्या या देशाला एका हिंदू मंदिरामुळे नवसंजीवनी लाभली आणि आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर या देशाने आपला मोठा ठसा उमटवला आहे. या देशाची आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ आपण जाऊन अनुभवायला हवी.
जवळजवळ 400 वर्षे हा सगळा अंकोर परिसर संपूर्णपणे दुर्लक्षित राहिला होता. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ऑरी माऊ हा काही वनस्पतींच्या शोधासाठी इथे फिरत असताना त्याला मंदिरांचे अवशेष आढळले. त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने ते स्वच्छ करून घेऊन एक एक मंदिर त्या झाडांच्या दाटीतून बाहेर काढले. आणि अशा प्रकारे असंख्य मंदिरे या प्रदेशी उघडकीला आली. जवळजवळ 400 वर्षे संपूर्णपणे झाडीत असलेली हे मंदिरे, त्यांच्या अवतीभोवती झाडांच्या मुळांचा विळखा पडला होता. ता प्रोम या ठिकाणी अशी मंदिरे आहेत की ती सर्व बाजूंनी झाडांनी वेष्टीलेली आहेत. जर झाडे तोडली तर ती मंदिरेसुद्धा ढासळतील. म्हणून ती झाडे तशीच ठेवून ही मंदिरे मोकळी केलेली आहेत. खाली मंदिर आणि त्याच्या सर्व बाजूंनी झाडांचा विळखा अशी रचना इथे खूपच आकर्षक आणि वेगळी दिसते. कंबोडिया सरकारने या गोष्टीचे सुद्धा सुंदर मार्केटिंग करून पर्यटकांना आकर्षित केलेले आहे. ता प्रोम मंदिरांना भेट देताना आपण कधी झाडाच्या ढोलीतून तर कधी त्याच्या फांद्यांच्या जंजाळातून जात असतो. मंदिरे अजून ढासळू नयेत म्हणून इथे आतूनसुद्धा त्यांना आधार दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या पुनर्निर्माणाच्या कमी हिंदुस्थानी पुरातत्व खात्याने मोठी मदत केलेली आहे.
सगळ्या जगाचे लक्ष लागून असलेले, खमेर स्थापत्याचा मेरुमणी असलेले, जागतिक वारसा म्हणून युनेस्कोचा दर्जा मिळालेले जगातील कोणत्याही धर्मीयामधील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेले ठिकाण म्हणजे हे अंकोरवाट मंदिर. याची संकल्पना, याची रचना, याचे स्थापत्य या सगळ्याच बाबतीत अवाढव्य असे असलेले हे मंदिर. ख्मेर राजा सूर्यवर्मा दुसरा (इ. स. 1113-1181) याने हे मंदिर बांधले. हे आहे विष्णूचे मंदिर. परंतु हे बांधताना हे मंदिर म्हणजे मेरू पर्वताचे प्रतीक आहे असे समजून बांधलेले आहे. त्यामुळे मुख्य मंदिराचा कळस सर्वात उंच आणि त्याभोवती इतर चार मंदिरे आहेत. मेरू पर्वताच्या आजूबाजूला असलेल्या शिखरांचे प्रतीक म्हणून ती चार शिखरे आहेत. मेरू पर्वत हा क्षीरसागरामध्ये स्थित आहे असे समजून या मंदिराच्या चारही बाजूंनी मोठा खंदक खणला असून त्यात कायम पाणी असते. चारही बाजूंनी या मंदिरात जाण्यासाठी या खंदकावर दगडी पूल बांधलेले आहेत. 510 एकर एवढ्या प्रचंड परिसरात बांधलेले हे महाकाय मंदिर. याची सगळी परिमाणे अचाटच म्हणायला हवीत. मंदिरात जाताना एकेका टप्प्यावर एका अशा तीन तटबंदी आहेत. प्रत्येक तटबंदीच्या आत मोठे प्रांगण आणि मोठमोठ्या गॅलरीज आहेत. त्यामध्ये असलेल्या भिंतींवर खूप लांबच लांब अशी कथनशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिरात जागोजागी भिंतींवर मूर्तिकला दिसून येते. त्यांना उठाव खूप कमी आहे, पण मूर्तींची विविधता खूप दिसते. समुद्रमंथनाच्या संकल्पनेचे मोठे आकर्षण या मंडळींना होते.
हिंदुस्थानच्या एका छोटय़ा राज्याएवढा असलेला हा देश मंदिर पर्यटनामुळे संपन्न आहे. अप्सरा नृत्य असो अथवा रंगकाम, चित्रकला असो, अंकोरवाट मंदिराशिवाय इथली कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. हिंदू मंदिरावर जगणारा, हिंदू मंदिराचे चित्र आपल्या झेंडय़ावर मिरवणारा आणि हिंदू मंदिराचे चित्र आपल्या रियाल या नोटेवर छापणारा कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे. नुसते अभिमान, गर्व असा आरडाओरडा करण्यापेक्षा आपल्या कृतीतून अभिमानाने ही प्रतीके मिळवणारा कंबोडिया पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार आहे.





























































