लेख – ठसा – प्राचार्य शरद अदवंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

गत वर्षभरात कोरोनामुळे विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचे झालेले निधन खरोखरच धक्कादायक असेच आहे. यात आपण आपल्या जवळचे स्नेहीही गमावले. संभाजीनगरातील सरस्वती भुवन विज्ञान  महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शरद अदवंत यांचे झालेले निधन असेच धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे. शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय असा लौकिक असणारे अदवंत सर एक ऋषितुल्य असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा सात्त्विक स्वभाव वागण्या-बोलण्यात आणि चेहऱ्यावर दिसत असे.

सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागात डेमोन्स्ट्रेटर म्हणून रुजू झालेले अदवंत स्वकर्तृत्वावर एम. एससी., पीएच.डी. करून त्याच महाविद्यालयात 1985 ते 2003 या काळात प्राचार्य झाले. मराठवाडा विकास चळवळीत तर त्यांचे सुरुवातीपासूनच योगदान होते. त्याच सोबत विविध सामाजिक चळवळीत, विविध संघटनांत त्यांचा सहभाग असायचा. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा ग्रंथमित्र ना. वि. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करता आले.

या दोघांच्या मार्गदर्शनाखाली अदवंत यांनी तब्बल चार दशकांपेक्षा अधिक काळ विकास चळवळीत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. सरस्वती भुवन या शिक्षण संस्थेसोबतच त्यांचा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, मराठवाडा जनता विकास परिषद या संस्थांशी प्रदीर्घ काळ संबंध, ऋणानुबंध राहिला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्राचार्यपद कुशलतेने सांभाळले. कुशल प्रशासन आणि निरपेक्ष भावनेतून त्यांनी शिक्षण क्षेत्र, विकासकार्य, विविध सामाजिक चळवळी यात आपल्या कार्यकौशल्याची अमीट छाप सोडली.

शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या त्यांनी पार तर पाडल्याच, शिवाय प्राचार्य महासंघाचे अध्यक्षपद ही महत्त्वाची जबाबदारी पूर्ण पार पाडली. विद्यापीठात सिनेट सदस्य, नॅक कमिटी सदस्य, महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या विशेष सेलचे सदस्य म्हणून प्राचार्य अदवंत यांनी काम पाहिले. विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयांचे ते तज्ञ सल्लागारही होते. उच्च शिक्षण आणि गुणवत्ता व्यवस्थापन यासाठी जो शासकीय सेल कार्यरत झाला, त्या काळात त्यांनी सदस्य म्हणून राज्यभर विविध कार्यशाळांचे आयोजन केले. त्याचा शासनाला अहवाल सादर केला. या माध्यमातून प्राचार्य अदवंत यांनी उच्च शिक्षणाची गुणवत्ता व व्यवस्थापनाअंतर्गत उपक्रमाला दिशा दिली. मराठवाडय़ासह महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्थांमधून शैक्षणिक नेतृत्व, मराठवाडय़ातील शैक्षणिक सुविधा आणि प्रश्न अशा महत्त्वपूर्ण विषयांवर परिसंवाद आणि कार्यशाळांचे सातत्याने आयोजन केले.

या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असो की अमरावती, नागपूर विद्यापीठ असो, तिथे तज्ञ सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राचार्य म्हणून महाविद्यालये आणि महासंघाचे नेतृत्व करणारे अदवंत यांचा अभ्यास दांडगा होता. विषय मग ते मराठवाडा विकास अनुशेष असो नाहीतर मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याचा असो, अशा सर्वांगीण प्रश्नांवर त्यांचा व्यासंग होता. एवढे सर्व व्याप-ताप सांभाळून त्यांनी आपल्यातील विविध सामाजिक प्रश्नांचा वेध घेणारा लेखक सतत जागता आणि अपडेट ठेवला. विविध दैनिकांत आणि जर्नल्समधून त्यांनी वैविध्यपूर्ण अभ्यासपूर्ण लेखन केले. सहा पुस्तकांचे लेखन आणि संपादनही केले. गोविंदभाई आणि ना. सी. देशपांडे यांच्यासारख्यांचे त्यांना मार्गदर्शन होते. या मार्गदर्शनातून त्यांनी आपला कार्यप्रवास बहुआयामी केला. असा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करणारे प्राचार्य अदवंत यांचा स्वभाव शांत, सहनशील आणि कमालीचा सात्त्विक. एक ऋषितुल्य, निस्पृह आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले होते. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातले ते अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व होते.

मराठवाडय़ाच्या प्रश्नांसंबंधी त्यांना आस्था नि आत्मीयता होती. मराठवाडय़ाचे प्रश्न त्यांना माहीत होते. त्याचा ते सातत्याने पाठपुरावा करीत असत. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा संशोधन संस्था असो की मराठवाडा जनता विकास परिषदेचे कार्य असो, तिथे प्राचार्य अदवंत यांनी आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला. विविध सामाजिक चळवळीत तर ते अग्रेसर होतेच. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या भरभराटीतही त्यांचा सहभाग होता. प्राचार्य अदवंत यांची विकासविषयक दृष्टी आणि भूमिका विकास परिषदेच्या लढय़ाला उपयुक्त अशीच होती. त्यांच्या निधनामुळे समाजातील विविध क्षेत्रांची तर हानी झालीच आहे, पण निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. अदवंत सरांचे असे अचानक जाणे क्लेषदायकच आहे. सामाजिक, शैक्षणिक चळवळीत असा तळमळीचा कार्यकर्ता आता होणे नाही.