केंद्रीय यंत्रणांना अमर्याद सत्तेचा उन्माद चढलाय! केजरीवाल यांचा हल्ला

केंद्रीय तपास यंत्रणांना अमर्याद सत्तेचा उन्माद चढला आहे. मोदी सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा हल्लाबोल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

ईडीने माझ्यावर केलेले आरोप ही राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांची हत्या आहे. मनी लॉण्डरिंग कायद्याला अपेक्षित असा गुन्हा मी केलेला नाही. माझा गुह्यात सहभाग असल्याचा पुरावा ईडीकडे नाही, असा दावा केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. मद्य धोरण घोटाळय़ाप्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांनी शनिवारी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.

गरज नसताना केली अटक

गरज नसताना चुकीच्या हेतूने मला ईडीने अटक केली आहे. अटकेच्या घडामोडी बारकीईने बघितल्या तर लक्षात येईल की, मोदी सरकारने सत्तेचा कसा गैरवापर केला आहे, असा हल्लाबोल केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

तथाकथित घोटाळय़ाचा एक रुपया आम आदमी पार्टीकडे किंवा माझ्याकडे असल्याचा पुरावा ईडीकडे नाही. ईडीचे आरोप अर्थ व तथ्यहीन आहेत. मी आदेशाचे पालन करत नाही, असे ईडीने कोणत्याच समन्समध्ये म्हटले नाही, असा आरोप केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष द्या

दिल्लीतील एमसीडीच्या शाळेत शिकणाऱया दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके उपलब्ध करून न दिल्याबद्दल राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे, असे न्यायालयाने दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेला म्हटले आहे. दरम्यान, नायब उपराज्यपालांनी नामनिर्देशित नगरसेवकांची बेकायदारपणे नियुक्ती केली आहे. त्यामुळे एमसीडीची स्थायी समिती स्थापन झालेली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे स्पष्टीकरण आम आदमी पक्षाने दिले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचा राजकीय कट

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे होऊ नये यासाठीच मोदी सरकारने राजकीय कट रचून मला अटक केली. विरोधकांना त्रास देण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणांचा कसा गैरवापर करते आहे हे माझ्या अटकेने स्पष्ट झाले आहे, असा दावा केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.