
सांगीतिक प्रवासाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीसंदर्भात त्या म्हणाल्या, माझा जन्म सांगलीचा. घरातही संगीताचे वातावरण. वडील तबलावादक, बहीण गायिका. अशा वातावरणात बालपणी मला संगीताचे बाळकडू मिळत गेले. वयाच्या तेराव्या वर्षापासून माझी कारकीर्द सुरू झाली. आयुष्याच्या टप्प्यावर गाणे भेटत गेले. यातील वाईटापासून दूर कसे राहता येईल ते शिकायला मिळाले. या प्रवासात पहिल्या गुरू लाभल्या माणिक वर्मा. त्यांच्याकडे नऊ वर्षे शिकले. माणिक वर्मा यांनी गाण्यातील चतुरस्रपणा, आवाजातील लगाव आणि प्रासादिकता कशी असते हे शिकवले. यशवंतबुवा जोशी यांच्याकडे एक तप संगीत साधना केली. त्यांनी रागांची शुद्धता जपून सौंदर्यस्थळे कशी सांभाळावीत, लयकारी कशी जपायची हे शिकवले. बाळकृष्णबुवा मोहिते हे लग्नाआधी संगीत क्षेत्रातील गुरू राहिले. पुढील प्रवासाच्या टप्प्यावर पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले. त्यांनी मैफलीत प्रसन्नपणा, चैतन्य कसे आणायचे, गाण्याचा आलेख कसा मांडायचा ते शिकवले. आशाताईंनी आपल्या सांगीतिक प्रवासात वेगवेगळय़ा संगीत घराण्यांना गाण्यातून आत्मसात केले. त्यातून गाणे कसं कसदार, दर्जेदार होईल याचा अभ्यास केला. म्हणूनच त्यांच्या गायनात किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्यांच्या शैली आणि वैशिष्टय़े दिसतात. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणतात, मला या सर्व दिग्गजांकडे शिकता आले ही परमभाग्याचीच गोष्ट आहे आणि चांगला गुरू लाभणे ही दैवी देणगी असते. ती मला लाभली.
‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात ‘प्रेक्षकांची मिळालेली टाळी ही कलावंतासाठी सरस्वतीचा शाप आहे’ या वाक्याविषयी आशाताईंना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, नुकताच हा चित्रपट मी बघितला. खरोखरच चित्रपटातील हे वाक्य प्रत्येकाने अंतर्मुख व्हावे असेच आहे. कलावंत टाळय़ांच्या आहारी गेला की, त्याची प्रगती खुंटते. कला ही नेहमी बदलणारी असते. मैफलीस मिळणारे यश आणि टाळय़ा हे विसरायला शिकले पाहिजे. खरे तर आज रिऑलिटी शोचा झगमगाट आहे. मेहनत, रियाज नको वाटतो. कारण त्याला एका रात्रीत मिळणारं यश हवे असते. गायकाने आपल्या गायनातील भाव अगदी सहज दाखवले पाहिजेत. चेहऱयावर उमटणारा भाव हा गाण्यात उतरला पाहिजे आणि ते तर अथक परिश्रम आणि साधनेतून शिकता येते. शोमॅनशिप, झगमगाट यापासून मिळणारं यश फार टिकत नसते. गायकाने उत्तम सादरकर्ता असावं. अशी गरज आम्हाला आमच्या काळी कधी वाटली नाही. गायकाने आपल्या गायनातून सहज भाव दाखवावेत असे संस्कार आमच्या पिढीवर झाले.
आशाताई म्हणाल्या, माझा सांगीतिक प्रवास, मानसन्मान, पुरस्कार यांची सर्वांनाच माहिती आहे, पण कलावंतांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे कार्य फार कुणाला माहीत नाही. कारण प्रसिद्धी मिळविण्यासाठी आम्ही काही खटाटोप करीत नाही. त्यामुळे संस्थेचे कार्य, त्यास मिळत असलेला प्रतिसाद मोठा असला तरी त्याची फार माहिती नाही. या संस्थेचा उद्देश संगीत नाटक, नृत्य, साहित्य, विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला व्यासपीठ निर्माण करून देणं हा आहे. या क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱया महनीय व्यक्तीस ‘उत्तुंग’ पुरस्कार देऊन प्रतिवर्षी सन्मानित केले जाते. या वर्षी हा पुरस्कार सावरकर विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत प्रा. शेषराव मोरे आणि ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांना घोषित झाला आहे. त्याचे सन्मानपूर्वक वितरण 20 जानेवारीस मुंबईत होणार आहे. ही संस्थाही आता रौप्य महोत्सवाच्या उंबरठय़ावर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पहिला पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना दिला. हा पुरस्कार एक लाखाचा आहे. सिंधूताईंचे एकूणच सामाजिक कार्य पाहता आणखी मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. आवाहनास प्रतिसाद म्हणून पावणेपाच लाख रुपये जमा झाले.
























































