
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. यावेळी काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभरात जबरदस्त आंदोलन केले. दिल्लीत शेकडो काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी ‘ईडी’ कार्यालयावर धडक दिली. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ‘ईडी’ला चांगलेच नडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सूडबुद्धीने विरोधकांवर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज राहुल गांधी मध्य दिल्लीतील ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. काँग्रेस मुख्यालयातून राहुल गांधी ‘ईडी’ कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बजेल, काँग्रेस नेते पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाल, के. सी. वेणुगोपाल, अधिररंजन चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने होते. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना यावेळी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. देशभरात रस्त्यांवर उतरून मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसने ‘ईडी’ विरोधात आंदोलन केले. मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, गुवाहाटी, जम्मू, डेहराडून, जयपूर आदी शहरांमध्ये आंदोलन केले.
गृहमंत्रालयाच्या दबावामुळे छापे – गेहलोत
अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत ‘ईडी’ला चांगलेच नडल्याचे पाहायला मिळाले. ‘ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱयांना भेटण्यासाठी मी वेळ मागितली होती. त्यांनी मला वेळही दिली. मात्र, त्यानंतर काय झाले माहीत नाही. अधिकाऱयांनी मला सांगितले, जयपूरला येऊन भेटतो. ईडी, आयकर या देशातील महत्त्वाच्या तपासयंत्रणा आहेत. त्या विनाकारण छापे टाकत आहेत, असे ट्विट गेहलोत यांनी केले आहे. या तपासयंत्रणांना छापे टाकण्याची इच्छा नसते. मात्र या यंत्रणांवर गृहमंत्रालयाचा दबाव आहे, असे गंभीर आरोपही गेहलोत यांनी केला.
राहुल गांधी यांची नऊ तास चौकशी
काँग्रेस नेते राहुल गांधी सकाळी 11.10 वाजता ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. 20 मिनिटे कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 पर्यंत त्यांची ‘ईडी’ अधिकाऱयांनी चौकशी केली.
तीन तासांच्या चौकशीनंतर दुपारी 2.30 वाजता ते ‘ईडी’ कार्यालयाबाहेर पडले. रुग्णालयात जाऊन त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता राहुल गांधी पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात आले. दिवसभरात तब्बल नऊ तास त्यांची चौकशी झाली. राहुल गांधी उद्याही ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.




























































