अपमानामुळे मराठी माणूस भडकला आणि आशिया कप स्पर्धा सुरू झाली

आशिया चषक स्पर्धा जवळ आली असून क्रिकेटप्रेमींना हिंदुस्थान विरूद्ध पाकिस्तान सामन्याची मोठी उत्सुकता आहे. या स्पर्धेमागचा इतिहास अनेकांना माहिती नाहीये. ही स्पर्धा एका मराठी माणसामुळे सुरू झाली आहे, हे तर फारच कमी लोकांना ठावूक आहे. या मराठी माणसाचा अपमान करण्यात आला होता. या अपमानामुळे हा मराठी माणूस पेटून उठला होता. त्याने या अपमानाचा बदला घ्यायचाच असा निश्चिय मनोमन केला होता आणि त्यातून या स्पर्धेचा जन्म झाला.

आशिया कप 2023 स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 30 ऑगस्टला आणि शेवटचा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे . यंदाची आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी सगळे सामने हे पाकिस्तानात खेळवण्यात येणार नाहीयेत. एकूण 13 सामन्यांपैकी 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि फायनलसह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने अनेकांना प्रश्न पडतो की ही स्पर्धा कशी सुरू झाली. यामागची कहाणी मोठी रंजक आणि मराठी माणसासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. 1984 मध्ये आशिया चषक स्पर्धेची सुरुवात झाली होती. ही स्पर्धा होण्यामागे 1983 सालच्या विश्वचषक स्पर्धेत घडलेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे म्हणजेच एन.के.पी.साळवे हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. 25 जून 1983 रोजी लॉर्ड्सवर विश्वचषक स्पर्धेचा ऐतिहासिक अंतिम सामना झाला होता. हा सामना स्टँडमधून पाहता यावा यासाठी साळवे यांना तिकीट हवे होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. याचा साळवे यांना प्रचंड राग आला होता. हा एकप्रकारे हिंदुस्थानींचा अपमान आहे असं साळवे यांना वाटलं होतं. त्यांनी मनातल्या मनात या अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय केला होता. विश्वचषक स्पर्धा ही इंग्लंडमधून बाहेर आणायची आणि ती इतरत्र खेळवण्यास सुरुवात करायची असा निश्चय साळवे यांनी केला होता.

साळवे यांनी हा निश्चय केला खरा, मात्र हे काम सोपे नव्हते. आज बीसीसीआयचा जो दबदबा आहे तो त्याकाळी इतका नव्हता. इंग्लंडचे क्रिकेट बोर्ड हे त्यावेळी ताकदवान होते आणि त्यांना झुकवणं हे अशक्यप्राय मानले जायचे. साळवे यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष नूर खान यांच्याशी चर्चा केली . त्यानंतर त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन प्रमुख गामिनी दिसानायके यांच्याशीही चर्चा केली. यानंतर 19 सप्टेंबर 1983 रोजी नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद ( ACC) ची स्थापना झाली.

या परिषदेत हिंदुस्थान, पाकिस्तान आणि श्रीलंका , बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूर या देशांना सामील करून घेण्यात आले. हिंदुस्थान , पाकिस्तान आणि श्रीलंका हे त्यावेळी आयसीसीचे पूर्ण सदस्य होते . यानंतर, आशियाई देशांनी एसीसीची स्थापना केल्यानंतर, क्रिकेटजगत विभागले गेले. यापूर्वी क्रिकेटजगताचे सगळे अधिकार हे आयसीसीकडे होते, ज्याला एसीसी स्थापन करून साळवे यांनी आव्हान दिले होते. कारण आशिया क्रिकेट स्पर्धेत फक्त आशियाई देशांनाच खेळण्याची परवानगी होती.

आशिया कप स्पर्धेचा पहिला मोसम 1984 साली झाला होता. ही पहिली स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची होती आणि ही स्पर्धा हिंदुस्थानने जिंकली होती. एकप्रकारे साळवे यांनी विश्वचषकाची छोटी आवृत्ती आशिया खंडात सुरू केली होती. या स्पर्धेवर आतापर्यंत टीम इंडियाचेच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत 15 वेळा आशिया कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून हिंदुस्थानी संघाने सर्वाधिक 7 वेळा ( १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८) ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 6 वेळा ( 1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) ही स्पर्धा जिंकली आहे . पाकिस्तानने या स्पर्धेचे विजेतेपद फक्त दोनदा विजेतेपद जिंकले ( 2000, 2012) आहे .

आशिया कप 2023 वेळापत्रक:
३० ऑगस्ट : पाकिस्तान वि. नेपाळ – मुलतान
३१ ऑगस्ट : बांगलादेश वि श्रीलंका – कॅंडी
2 सप्टेंबर : हिदुस्थान वि. पाकिस्तान – कॅंडी
३ सप्टेंबर : बांगलादेश वि अफगाणिस्तान – लाहोर
४ सप्टेंबर : हिदुस्थान वि. नेपाळ – कॅंडी
5 सप्टेंबर : श्रीलंका वि अफगाणिस्तान – लाहोर

सुपर- 4 स्टेज वेळापत्रक
६ सप्टेंबर: A1 Vs B2 – लाहोर
९ सप्टेंबर: B1 v B2 – कोलंबो
१० सप्टेंबर: A1 v A2 – कोलंबो
१२ सप्टेंबर: A2 v B1 – कोलंबो
14 सप्टेंबर: A1 v B1 – कोलंबो
15 सप्टेंबर: A2 v B2 – कोलंबो
17 सप्टेंबर : अंतिम – कोलंबो