आता सहनशीलतेचा अंत पाहू नका! सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा

supriya-sule

मी गेली आठ महिन्यापासून गप्प आहे. म्हणजे आम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही हा गैरसमज ठेऊ नये, माझ्या रोहितच्या आई बद्दल एकवेळ बोलला गप्प बसलो, दुसऱया वेळी गप्प बसू मात्र तिसऱया वेळी बोलला तर…आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता दिला आहे.

बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभाताई पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार आणि त्यांचे अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि मी घराणेशाहीत आहोतच. शून्यातून विश्व कोणी निर्माण केले, तर ते शरद पवार यांनी. त्यामुळे मी, अजित पवार आणि सुनेत्रा पवार आम्ही तिघेही घराणेशाहीत आहोत. मी हे पार्लमेंटमध्येदेखील बोलले आहे. जन्म झाल्यावर खाली हात येतात आणि खाली हात जातात. नाती तुटायला वेळ लागत नाही. मात्र नाती जपायला वेळ लागतो. माझ्या आणि रोहितच्या आई बोललात ठीक आहे. माझ्या मनगटात मोठी ताकद आहे, ती म्हणजे, माझी आजी शारदाबाईच्या बांगडय़ांची. आज आमचे विरोधक आमच्या कुटुंबाचे वाभाडे काढत आहेत. माझी लढाई नात्याशी नसून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणाऱयांच्या विरोधात आहे. बारामती म्हणजे शरद आणि शरद म्हणजे बारामती आहे. कोणी गैरसमज करून घेऊ नका. विकास काही कोणी किंवा मी स्वतःच्या खिशातून करत नाही. त्यामुळे मी विकास केला नाही, आम्ही मिळून विकास केला आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

होय, आम्ही बाहेरच्याच!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका सभेत सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बाहेरच्या असा केला होता. त्यावर अजित पवार यांनी सभांमधून शरद पवार यांच्यावर टीकेचा सपाटा लावला. अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी या मेळाव्यात त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. होय, आम्ही बाहेरच्याच आहोत. मी नणंदेची (सुप्रिया सुळे) जागा कधीही घेणार नाही. मूळ डीएनए, जो पवारांचा आहे, सुप्रिया सुळे यांच्यातच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जे वक्तव्य केले, ते काही चुकीचे नाही, असे शर्मिला पवार म्हणाल्या.

लेकीसाठी आईही मैदानात

z बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आता त्यांच्या आई प्रतिभा पवार यादेखील मैदानात उतरल्या आहेत. आजच्या महिला मेळाव्यास उपस्थित राहत त्यांनी लेकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. याआधी सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांनी बारामतीत पदयात्रा काढून आईच्या प्रचारात उडी घेतली. रेवती यांच्या पाठोपाठ त्यांच्या आजीही आता लेक सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. प्रतिभा पवार यांच्या मेळाव्यातील उपस्थितीने हे स्पष्ट झाले असून, बारामतीच्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा आज सुरू होती.