ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या रेषेवर; जगज्जेत्या इंग्लंडचा पराभवाचा षटकार

‘ऍशेस’ मालिकेसारखे द्वंद्व पाहण्याच्या इच्छेने जमलेल्या अर्धा लाख प्रेक्षकांना ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी निराश केले नाही. मात्र इंग्लंडने सर्वांचीच निराशा केली. जगज्जेता इंग्लंडचा संघ सहाव्या पराभवामुळे नॉकआऊट झाला, तर ऑस्ट्रेलियाने सलग पाचवा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या रेषेजवळ स्वतःला नेऊन ठेवले. येथून ऑस्ट्रेलिया आता बाद होऊ शकत नाही. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तिघांना सर्वस्व पणाला लावावे लागेल. फक्त या तिघांत न्यूझीलंडसाठी श्रीलंकेला हरवणं सोप्पं असल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीची अधिक संधी आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचा प्रवास अधिक खडतर झालाय. खेळाबरोबर भाग्याची सोबत लाभली तरच ते उपांत्य फेरीत दिसतील, अन्यथा त्यांच्यासाठी वर्ल्ड कप संपलेला असेल.

नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेणाऱया इंग्लंडला आपण पाठलाग करू असा विश्वास आजही होता. त्यांच्या तळाच्या फलंदाजी शेवटच्या विकेटपर्यंत केलेल्या संघर्षाने ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून फेस काढला होता. डेव्हिड मलान (50), बेन स्टोक्स (64) आणि मोईन अली (42) यांनी विजयापासून 100 धावा दूर असतानाच संघाची साथ सोडली होती, पण तेव्हाच ख्रिस व्होक्स (32), डेव्हिड विली (15) आणि आदिल राशीद (20) यांनी इंग्लंडला विजयाची स्वप्नं दाखवली. सोबत उपांत्य फेरीची आसही जागवली. पण 13 चेंडूंत 34 धावांची गरज असतानाच व्होक्स बाद झाला. मग पुढच्याच षटकांत आदिल राशीदही बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने 33 धावांनी आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला पराभवाची झळ दिली. यात ऍडम झम्पाने मोलाचा वाटा उचलत 21 धावांत 3 विकेट टिपले. तसेच तळाला येऊन ठोकलेल्या 29 धावाही निर्णायक ठरल्या. तोच ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हीरो ठरला.