प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यथा लिखाणात मांडून समाजव्यवस्थेविरुद्ध आसूड ओढणारे प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर यांचे शनिवारी सकाळी रत्नागिरी येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही त्यांची कादंबरी गाजली होती. याच कादंबरीवर आधारीत नाटक लिहण्यात आले होते. तसेच या कादंबरीचा 1985 मध्ये फ्रेंच भाषेत अनुवाद करण्यात आला होता. 1992 व 2001 मध्ये याचे हिंदी अनुवादही झाले होते.

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, अजून उजाडायचे आहे, अनाथ, छेद, वेध, झपाटलेला, कळा त्या काळच्या, डाळं, देशोधडी, हाताची घडी तोंडावर बोट, आता उजाडेल, एक होती कातळवाडी या कादंबरीचे लेखन माधव कोंडविलकर यांनी केले आहे. निर्मळ,काहीली हे त्यांचे कथासंग्रह आहेत. देवदासी, कोंगवन हे शोधग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. बालसाहित्यात ईटुकलेराव,छान छान गोष्टी तसेच देवांचा प्रिय राजा सम्राट अशोक ही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. तर स्वगत व स्वागत हे संपादित साहित्य माधव कोंडविलकर यांच्या नावावर आहे. कोंडविलकर जे जगले, त्यांनी जे अनुभवले त्याचे चित्रण त्यांच्या कथा, कादंबरीतील पात्रांच्या रुपातून वाचकांसमोर येते. एक तळमळीचा लेखक अशी त्यांची ओळख होती.

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही कादंबरी कोंडविलकर यांच्या रोजनिशीवर आधारीत आहे. ही पहिल्यांदा 1977 मध्ये तन्मय दिवाळी अंकात छापून आली होती. त्यानंतर 1979 मध्ये त्यांच्या पत्नी उषा कोंडविलकर यांनी मुलगी ग्लोरीयाच्या नावाने त्याचे प्रकाशन केले. 1987 मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली . त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, जावई,नातू असा परीवार आहे.