
मुंबईसह राज्यात कोरोना नियंत्रणात येत असताना कोरोनाचा अतिजलद संसर्ग करणाऱया बीए-4 आणि बीए-5 व्हेरिएंटने मुंबईत शिरकाव केल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेने प्रसिद्ध केलेल्या जिनोम अहवालात बीए 4 चे तीन तर बीए 5 चा एक रुग्ण सापडल्याचे म्हटले आहे. या चार रुग्णांमध्ये दोन 11 वर्षांच्या मुली असून दोन 40 ते 60 वयोगटातील पुरुष आहेत. दरम्यान, या चारही जणांनी होम क्वारंटाइननंतर व्हेरिएंटवर मात केली असल्याची माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. दरम्यान, राज्यात या दोन व्हेरिएंटची रुग्णसंख्या 12 वर पोहोचली आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असताना मुंबईत बीए-4चे तीन आणि बीए-5 चा एक रुग्ण सापडला आहे. मात्र, त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आल्यानंतर हे सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मागील 15 दिवसांत त्यांनी परदेशात किंवा राज्यात प्रवास केलेला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. याआधी पुण्यात 28 मे रोजी बीए 4 व्हेरिएंटचे 4 बीए 5 व्हेरिएंटचे 3 रुग्ण आढळले होते. या 7 रुग्णांनी नवीन व्हेरिएंटवर मात केली आहे, तर पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय चाचणी अहवालानुसार, आयसर या प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत पुणे येथील 37 वर्षीय पुरुषामध्ये बीए 5 व्हेरियंटचा विषाणू सापडला होता. हा तरुण 21 मे रोजी इंगलंडमधून पुण्यात आला होता. त्याने परदेशात कोविशिल्डचे दोन डोस घेतले होते. मात्र, तरीही त्याला 2 जूनला कोरोना झाला. त्याला सौम्य लक्षणे होती. या रुग्णाला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यात तो बरा झाला आहे.
कोरोना नियमांचे पालन करा
कोरोनाच्या विविध उपप्रकारातील विषाणूची होणारी लागण लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करा. ‘मास्क’चा वापर, दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर, नियमितपणे साबणाने हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी केले आहे.
मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या घटली
मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या घटली असून राज्यात दिवसभरात 1 हजार 885 रुग्ण सापडले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात 774 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 480 वर पोहोचली आहे. मुंबईत रविवारच्या तुलनेत आज 700 ने रुग्णसंख्या कमी झाली. आज दिवसभरात 1 हजार 118 रुग्ण सापडले. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात 676 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 573 वर पोहोचली आहे.

































































