इंजेक्शनच्या बाटलीत पॅरासिटॉमॉल गोळय़ांचे पाणी भरून विक्री, बारामतीत नागरिकांच्या जिवाशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेड, ऑक्सिजन मिळणे अवघड झाले आहे तर रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठय़ा प्रमाणात तुटवडा भासत असून त्याचा काळाबाजार सुरू आहे. मात्र, इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरॉसिटॉमॉल गोळ्यांचे पाणी भरून त्याची इंजेक्शन म्हणून 30 ते 35 हजार रुपयांना विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱया चारजणांच्या टोळीच्या मुसक्या बारामती पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून रेमडेसिविरची तीन इंजेक्शन्स व अलिशान फॉर्च्युनर वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

प्रशांत सिद्धेश्वर घरत (23, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), दिलीप ज्ञानदेव गायकवाड (35), शंकर दादा भिसे (22, दोघे रा. काटेवाडी, ता. बारामती) व संदीप संजय गायकवाड (20, रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.