
>> स्पायडरमॅन
आजवर अनेकदा आपण परदेशातील हॉस्पिटल्स, विमानतळे, सुपर मॉल, बस टर्मिनल्स अशा विविध ठिकाणी लोकांना मदत करणारे, त्यांना हवी असलेली माहिती पुरवणारे असे रोबोट बघितले आहेत किंवा त्याविषयी विविध ठिकाणी वाचलेले आहे. विमानतळावर छोटय़ा मोठय़ा माहितीसाठीदेखील प्रवाशांना सतत ‘हेल्प डेस्क’कडे धाव घ्यावी लागत असते किंवा सतत घोषणांकडे लक्ष देऊन बसावे लागते. अशा ठिकाणी हे रोबोट प्रवाशांसाठी देवदूतच ठरतात; जे त्यांना हवी ती माहिती सेकंदात देतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे रोबोट सर्व काम पार पाडत असतात, मात्र आता चक्क हिंदुस्थानातदेखील अशा रोबोटच्या वापराला सुरुवात करण्यात आली आहे. बंगळुरू विमानतळावर सध्या अशा दहा रोबोटची चाचणी घेतली जात आहे. बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुसज्ज असे रोबोट तैनात करण्यात आले आहेत. हे रोबोट प्रवाशांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देतील. विशेष म्हणजे हे रोबोट फिरते असणार आहेत; जे विमानतळावर सतत इकडे तिकडे हिंडत प्रवाशांना मदत करणार आहेत. हे रोबोट प्रवाशांना विमानाच्या उड्डाणाचा वेळ, हवामानाची स्थिती, विमानतळावर एखादी जागा उदा. हॉटेल, बुक स्टॉल कुठे आहे, त्या ठिकाणी कसे जावे इत्यादी माहिती देण्यास सक्षम आहेत. अगदी साध्या सोप्या शब्दांत त्यांच्याशी संवाद साधून प्रवासी आपले बेसिक प्रश्न सोडवून घेऊ शकतात. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याबरोबरच गरज भासल्यास ते प्रवाशांना त्यांना हव्या असलेल्या जागेपर्यंत नेऊन पोहोचवण्याचे कार्यदेखील पार पाडतील. प्रवाशांच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यास हे रोबोट असमर्थ असतील; तर ते लगेच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून प्रवाशाचा संपर्क ‘हेल्प डेस्क’बरोबर करूनदेखील देणार आहेत. या रोबोटचे काम आणि त्यावर येणाऱया प्रवाशांच्या प्रतिक्रिया बघून या रोबोटची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या या रोबोटची डिफॉल्ट भाषा इंग्रजी असून, स्थानिक भाषेसह इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये त्याच्याशी संवाद साधता येणार आहे.






























































