
आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नवं विधान केलं आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी अजानवरून विधान केलं आहे. प्रज्ञा सिंह म्हणाल्या आहेत की, अजानचा आवाज प्रचंड मोठा येतो, त्यामुळे झोप मोड होते. काही रुग्णांना रक्तदाबाचा त्रास देखील जाणवतो.
भोपाळ मध्ये बैरसिया येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी हे विधान केले आहे. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या,’ खूप जोरजोरात आवाज येतो. सकाळी साडे वाजल्यापासून तो आवाज सतत सुरू असतो. सगळ्यांची झोपमोड होते. अनेकांना त्याचा त्रास होतो.’
त्या पुढे म्हणाल्या की, ही वेळ म्हणजे साधू सन्यासी यांच्या ध्यानधारणेची वेळ असते. ब्रह्म मुहूर्तापासून ध्यान सुरू होते. आमच्या पहिल्या आरतीची वेळ देखील पहाटे 4 पासून होते. मात्र कुणालाही याची पर्वा नाही की जबरदस्ती तो भोंग्याचा आवाज आमच्या कानात शिरतो. आम्ही माइक वापरला तर अन्य धर्मियांना त्याचा त्रास जाणवतो. म्हणतात की, ‘आम्ही इतर कुणाच्या इबादत, प्रार्थनेचे शब्द ऐकू शकत नाही, कारण इस्लाम आम्हाला त्याची परवानगी देत नाही आणि तसे करणे इस्लाममध्ये योग्य मानले जात नाही.’
याआधी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यावरून त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. किमतींच्या वाढीचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचा फुकटचा प्रोपोगंडा आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.




























































