सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेविरोधात बिल्किस बानोचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

2002 च्या गुजरातमधील दंगलीत सामूहिक बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देत बिल्किस बानोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार बानोने सर्वोच्च न्यायालयाच्या मे महिन्यात दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका देखील दाखल केली ज्यात गुजरात सरकारला 1992 च्या माफी धोरणासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली होती.

हे प्रकरण सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर यादीसाठी नमूद करण्यात आले होते. दोन्ही याचिकांवर एकत्रितपणे आणि एकाच खंडपीठासमोर सुनावणी करता येईल का याचा निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

गँगरेप प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अकरा दोषींना 15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारच्या पॅनेलने शिक्षा माफीसाठी त्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर गोध्रा उप-कारागृहातून मुक्त करण्यात आले.

राधेश्याम शहा या दोषींपैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुजरात सरकारने आपल्या माफी आणि मुदतपूर्व सुटका धोरणांतर्गत दोषींची सुटका केली. 2008 मध्ये मुंबईतील सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या शहा यांना 15 वर्षे 4 महिने तुरुंगवास पूर्ण झाला होता.

दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यात 3 मार्च 2002 रोजी जमावाने बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला आणि तिची तीन वर्षांची मुलगी सालेहा हिच्यासह 14 जणांची हत्या करण्यात आली. त्यावेळी बिल्किस गरोदर होती.