भाजप अल्पसंख्याक आघाडी शहर उपजिल्हाध्यक्षांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिक्याच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला असून भाजपा अल्पसंख्याक आघाडी शहर उपजिल्हाध्यक्ष नदीम शेख, अक्षय बोल्ली, परवेझ खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे, विधानसभा संपर्कप्रमुख विलास घुगरे, दिपक महाडिक, सत्यवान भोसले, गणेश चोथे, विनायक उडता, गणेश महेश्वर, सागर वाकोडे, ओंकार केंद्रे, गुरफान शेख, जुनेद शेख, गोविंद चिलवर, अक्षय बोडखे, अनिल वडलाकोंडा, गणेश मोमिन, धनेश बिमन, शाहबाद शेख, सचिन साठे, ऋषीकेश बिमन, रोहित केंद्रे आदि उपस्थित होते.

शिवसेनेने नेहमीच युवकांना प्रोत्साहनच देण्याचे काम केले. त्यांचे प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यामुळे युवक हे नेहमीच शिवसेनेच्या मागे उभे राहिले आहेत. बुधवारी शिवसेनेत आलेले कार्यकर्ते समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे आहेत. तळागाळातील लोकांची कामे ते करतात, परंतु भाज़पाने त्यांना कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही, फक्त त्यांचा वापरच केला. परंतु शिवसेनेमध्ये असे होत नाही, प्रत्येकाला त्याच्या कार्यकर्तुत्वानुसार योग्य तो सन्मान दिला जातो. राजकारणापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि ते सोडविण्यासाठी आजचा युवक झटत आहे. या युवकांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शिवसेना नेहमीच अशा युवकांच्या मागे खंबीरपणे उभी राहिल, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

युवकांच्या कार्याला योग्य न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे युवकांचा शिवसेनेकडे ओढा आहे. भाजपमध्ये असतांना नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु कामे होत नाही. वरिष्ठांकडून नेहमीच डावलण्यात आले. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे नदीम शेख म्हणाले.