स्थानिक पातळीवर विखेंना विरोध वाढल्याने भाजप अडचणीत; विजयासाठी वरिष्ठ नेत्यांवरच भिस्त

भाजप निष्ठावंतांची विखेंवरची नाराजी, पक्षातील अंतर्गत गटबाजी तसेच महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवार पाहता नगरमध्ये भाजपला पळता भुई थोडी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील नेत्यांपर्यंत सर्वजण सभा घेत उमेदवार निवडून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबत आता भाजपमध्येच चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर विखेंना विरोध वाढत असल्याने नगरमध्ये भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहे.

भाजपने सुजय विखे यांना दुसऱ्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्याचे पडसाद नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. विखे यांनी पाच वर्षांमध्ये कोणालाही विचारले नाही. विकास कामांबाबत त्यांनी जी आश्वासने दिली, ती पाळली नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत. पक्षातील निष्ठावंतांनाही त्यांनी कधी जुमानले नाही. त्याचे पडसाद आता निवडणुकीदरम्यान दिसत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांची विखेंवर नाराजी वाढत आहे. त्यामुळे भाजपतील अनेकजण निवडणुक प्रचारासाठी सक्रिय झालेले नाहीत, असे दिसून येत आहे.

काही जणांनी तर थेट विखे व त्यांच्या समर्थकांना विरोध करत गावांमधून येण्यास विरोध केला आहे. त्याचे पडसाद आता या मतदारसंघांमध्ये उमटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी नगरमध्ये नरेंद्र मोदींसह, योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांच्या सभा होत आहेत.

एकंदरीतच विखेंना ही निवडणूक काही सोपी नाही, हे दिसून येत आहे. महाविकास आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला ही निवडणूक जड जाणार, हे निश्चित झाले होते. गावागावांमध्ये लंके यांचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले, तर विखे यांना प्रत्येक ठिकाणी विरोध झाला. त्यामुळे आगामी काळामध्ये जनतेच्या रोषाला सामोरे जायचे कसे, असा प्रश्न विखे यांना पडला आहे. त्यामुळे सभांशिवाय आता पर्याय नाही अशी चर्चा आता भाजप वर्तुळामध्ये सुरू आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा अनेक आश्वासने देण्यात येत आहेत. मात्र, आता जनता याला भूलणार नाही, असा सूर नगरमध्ये दिसत आहे.