
अभिनेता टायगर श्रॉफसाठी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा भाजप आमदाराने अपमान केला आहे. ही संतापजनक घटना भाजपनेच आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान घडली आहे.
भाजपने मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव अशा नावाने वरळी येथील जांबोरी मैदानात दिवाळीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना गायनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या कार्यक्रमाला सुरू होण्यास अवघ्या काही क्षणांचा अवधी असताना या ठिकाणी टायगर श्रॉफचं आगमन झालं.
टायगरचं तिथे आगमन होताच मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा त्याला घेऊन रंगमंचाच्या दिशेने निघाले. त्यांना टायगरचा सत्कार करायचा होता. त्यामुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी कार्यक्रम पाच मिनिटे थांबेल असं जाहीर केलं. पण, याला राहुल देशपांडे यांनी आक्षेप घेतला. ‘मी पुढच्या 20 मिनिटात गाणं संपवतो मग तुम्हाला जे हवं ते करा. अन्यथा मी गाणं थांबवतो’, असं देशपांडे यांनी आधी श्रोत्री आणि नंतर कोटेचा यांना सांगितलं. पण, तरीही त्यांना न जुमानता कोटेचा यांनी राहुल यांचं गाणं थांबवून तिथेच टायगर श्रॉफ याचा सत्कार केला.
या सर्व प्रकाराचा व्हिडीओ विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ट्वीट केला आहे. ही मराठी कलाकारांची चेष्टा असल्याची प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!
भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022





























































