मेरी कोम : ‘सुपरमॉम’ ते बॉक्सिंगच्या रिंगमधील ‘आयर्न लेडी’

मेरी कोम (बॉक्सिंग)- पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस

गणेश पुराणिक । मुंबई

‘सुपरमॉम’ मेरी कोम हिने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सहाव्यांदा ‘सुवर्ण’ठोसा लगावला आणि संपूर्ण हिंदुस्थानात एकच जल्लोष सुरू झाला. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदकं आणि एकूण सात पदकं जिंकणारी मेरी कोम ही जगातील एकमेव खेळाडू आहे. वयाच्या 35 शीतही तिची कारकीर्द बहरात असून त्याला पुढेही अनेक पदकांचा साज चढेल यात शंकाच नाही. हिंदुस्थानमध्ये महिलांना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये ओढणारी, त्यांना लढण्याची प्रेरणा देणारी मेरी कोम हिची कहाणी तेवढीच मनोरंजक आणि खडतर आहे.

मेरी कोम हिचा जन्म हिंदुस्थानच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमधील एका दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये गरीब कुटुंबामध्ये झाला. 1 मार्च 1983 ही तिची जन्मतारीख. मेरी कोम हिचे पूर्ण नाव मांगते चुंगनेजंग मेरी कोम असे आहे. घरची परिस्थिती दोन वेळचे पोट भरेल इतकीच होती. वयाच्या 17 व्या वर्षी बॉक्सिंगप्रति आवड निर्माण झाल्याने घरच्यांचा विरोध झुगारून मेरी कोम मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आली. तिची प्रेरणा होता बँकॉकच्या आशियाई स्पर्धेत खेळणारा मणिपूरचा बॉक्सर डिंको सिंग. या स्पर्धेत डिंको सिग याने सुवर्णपदक जिंकले आणि मग सुरू झाला मेरी कोमचा जागतिक चॅम्पियन, ऑलिम्पिक पदक विजेती होण्याचा प्रवास.

mary-kom-old

आई-वडिलांची गरीब परिस्थिती यामुळे मेरी कोम हिने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घरच्यांना पटला नाही. परंतु असे असतानाही 2000 मध्ये तिने घर सोडले आणि थेट राजधानी इंफाळ गाठलं. एक मुलगी म्हणून मेरी कोमला वडिलांनी बॉक्सिंग खेळण्यास मज्जाव केला, समाजाने देखील तिच्या बॉक्सिंगपटू होण्याच्या स्वप्नांची थट्टा केली. रेल्वेने प्रवास करताना तिचे पैशांचे पाकिटही हरवले, लैंगिक शोषणाली देखील सामारे जावे लागले. परंतु त्यावरही मात करत ‘बॉक्सिंग एके बॉक्सिंग’ असं एकच ध्येय घेऊन आलेली 17 वर्षीय मेरी हिने अल्पावधीतच बॉक्सिंगचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत विजयाची मोहोर उमटवली. तोपर्यंत घरच्यांचा विरोध सुरूच होता, परंतु स्पर्धा जिंकल्यानंतर मेरी कोमचे फोटो सर्व वृत्तपत्रांमध्ये झळकले आणि मुलीचे कौतुक पाहून घरच्यांचा विरोधही मावळला. त्यानंतर ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धा, हिस्सार येथील दुसरी आशियाई स्पर्धा, तैवानमध्ये विजयाची पुनरावृत्ती आणि त्यानंतर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील पदकांचा रतीब. सर्वच कसे स्वप्नवत होते, परंतु जसे दिसते तसे कधीच नसते.

mary-kom01

‘माझ्या प्रत्येक पदकामागे एक वेगळा संघर्ष आहे,’’ हे मेरी कोमचे वाक्य अतिशय बोलके आणि तेवढेच मार्मिक आहे. जागतिक स्तरावर मेरी कोम हिची लढवय्यी वृत्ती आणि वीजिगिषू वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. 2003मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2004, 2005 आणि 2006मध्ये तिने सलग तीन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. या तिच्या यशाचे गमक आहे फिटनेसमध्ये. मेरीची विरोधी खेळाडूला रिंगमध्ये पळवून पळवून दमछाक करण्याची कला जबरदस्त आहे. विरोधी खेळाडू दमला की मेरी तिच्यावर त्वेषाने तुटून पडते आणि पॉईंट मिळवते. मेरीचा हल्ला जेवढा ताकदवर तेवढाच बचावही जबरदस्त.

mary-kom-family

पतीचा जबरदस्त सपोर्ट
मेरी कोमच्या यशामागे तिची प्रचंड मेहनत असली तरी पतीने दिलेला सपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे, हे येथे नमूद करावे लागेल. पती ओनलेर कोम याच्या सपोर्टशीवाय मेरी कोमला एवढा पल्ला गाठणे शक्यच नव्हते. लग्नाआधी चार वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते आणि 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर चूल आणि मूल साभाळावं अशा जुनाट विचारसणीला जबरदस्त ठोसा तिने लगावला. यासाठी तिला फिटनेसवरही विशेष काम करावे लागले. 2005 मध्येच तिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 2007 मध्ये तिला जुळी मुलं झाली आणि तर 2013 ला एक मुलगा झाला. विश्रांतीनंतर तेवढ्याच जोमाने पुनरागम करणे सर्वांनाच जमते असे नाही, परंतु कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळत 2010 आणि 2012 ला मेरीने आशियाई स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरीची पुनरावृत्ती केली. मेरीच्या या यशाची दखल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने घेतली आणि तिला ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे नाव देऊन गौरव केला.

mary-kom-olympic

ऑलिम्पिक पदकाला गवसणी
जागतिक स्तरावर नंबर एक असणारी मेरी कोम हिने 51 ऐवजी 48 किलो वजनी गटात खेळण्यास प्रारंभ केला. तीन मुलांची जबाबदारी सांभाळत मेरीने रिंगमध्ये प्रचंड मेहनत केली. याच मेहनतीचे फळ तिला 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळाले. येथे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली आणि आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले. पदक मिळवल्यानंतरही तिने देशवासीयांची माफी मागितली. ‘मी तुम्हाला सुवर्णपदक देऊ शकली नाही’ असे मेरी म्हणाली. यातून तिची देशभावना, समर्पण लक्षात येते. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देणारच असा जबरदस्त विश्वास तिने व्यक्त केला असून ती त्या तयारीलाही लागली आहे.

mary-kom02

हजारो मेरी कोम घडवण्याची इच्छा
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक विजेती, खासदार, बॉक्सिंग अकॅडमीच्या मालक, सरकारी पर्यवेक्षक, आई आणि पत्नी अशा अनेक भूमिका मेरी एकावेळी निभावत आहेत. आपल्यासारख्या हजारो मेरी कोम घडवण्याची तिची इच्छा असून पतीसोबत ती इंफाळ येथे बॉक्सिंग अकॅडमी चालवते. या अकॅडमीत शेकडो मुली मेरी कोम बनण्याचे स्वप्न घेऊन रिंगमध्ये घाम गाळताना दिसतात. स्पर्धेतून वेळ मिळाल्यानंतर मेरी येथे असंख्य मेरी कोम घडवण्यासाठी जातीने हजर असते.

mary-kom-movie

बॉलिवूडलाही भुरळ
2013 ला मेरी कोम हिने ‘अनब्रेकेबल’ नावाचे आत्मचरित्र लिहिले. मेरीची यशाची कहाणी आणि संघर्षगाथेची बॉलिवूडला देखील भुरळ पडली आणि ती कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे ठरले. 2014 मध्ये मेरीच्या जीवनावर आधारित ‘मेरी कोम’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरीची भूमिका केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला.

मेरी कोमची कामगिरी –
जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप – 6 सुवर्ण, 1 रौप्य
आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप – 5 सुवर्ण, 1 रौप्य
आशियाई स्पर्धा – 1 सुवर्ण, 1 कांस्य
इनडोअर आशियाई स्पर्धा – 1 सुवर्ण
आशियाई चषक स्पर्धा – 1 सुवर्ण
लंडन ऑलिम्पिक – कांस्य पदक

आपली प्रतिक्रिया द्या