
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांना सर्वोतोपरी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. निवासी मंडप, नियंत्रण कक्ष, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, प्रसाधनगृहे, टेहळणी मनोरा, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था अशी चोख व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपआयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे 2020 आणि 2021 या सलग दोन वर्षी महापरिनिर्वाण दिनी नियमांचे पालन करून अनुयायांनी आपले श्रद्धासुमन अर्पित केले होते. मात्र या वर्षी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशभरातून मोठय़ा संख्येने भीम अनुयायी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या लाखो भीम अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका सर्वोतोपरी सुविधा देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई पोलीस दलाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणतीही उणीव भासणार नाही
मुंबई महापालिकेच्या वतीने कोरोनापूर्व काळात ज्या प्रकारे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात लाखो अनुयायांसाठी सुविधा पुरवण्यात येत होत्या त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा अनुयायांसाठी पुरवण्यात येणार आहेत. त्यात काही उणीव पडणार नाही, कमी पडणार नाही. त्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचे आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.




























































