
सामना ऑनलाईन । मुंबई
म्हाडामध्ये अधिकारी आहे. स्पेशल कोटय़ातून कुर्ल्याच्या व्ही. बी. नगर परिसरातील म्हाडाचा फ्लॅट मिळवून देतो, अशी बतावणी करीत एका व्यावसायिकाला 15 लाखांचा चुना लावणाऱ्या एका भामटय़ाला चुनाभट्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमितेश (नाव बदललेले) हे व्यावसायिक असून ते सैफुलुहा इद्रिसी याला ओळखत होता. त्यामुळे मला घर पाहिजे असल्याचे अमितेशने इद्रिसीला सांगितले होते. इद्रिसीने माझी म्हाडा अधिकाऱयांशी ओळख आहे. ते स्पेशल कोटय़ातून फ्लॅट मिळवून देतील असे सांगितले. त्यानंतर इद्रिसीने रामदास चव्हाण आणि विजेंद्र पेडकलकर यांच्याशी ओळख करून दिली. रामदास आणि विजेंद्र हे म्हाडा अधिकारी असल्याची ओळख इद्रिसीने अमितेशला सांगितली. त्यानंतर तिघांनी मिळून व्ही. बी. नगरातील म्हाडाचे दोन फ्लॅटदेखील दाखवल्याने ते घेण्याची तयारी त्याने दाखवली. आरोपींनी त्याच्याकडून 15 लाख घेतले आणि मोबदल्यात रजिस्ट्रेशन आदी कागदपत्र दिले. पण ती सर्व बोगस होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजेंद्र पेडकलकरला अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.




























































