
कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे दहशत पसरवण्यासाठी केला जाऊ नये. तसे कोणी करत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावले आहे.
हा कायदा महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी व पीडितांना संरक्षण देण्यासाठी आहे. अशा कल्याणकारी कायद्याचा वापर सूड घेण्यासाठी किंवा हिशेब चुकता करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसे कोणी करत असेल तर त्याकडे न्यायालय मूक प्रेक्षक म्हणून बघू शकत नाही, असे न्या. रणजितसिंह भोसले यांच्या एकल पीठाने बजावले.
एका महिलेने सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले.
दुसऱ्या पतीवर गुन्हा होऊ शकत नाही
घटस्फोट न घेता महिलेने दुसरा विवाह केल्यास त्या पती व सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. कारण घटस्फोटाशिवाय केलेला विवाह व पती कायद्याने वैध ठरत नाही. या पतीचे नातलग सासरचे होत नाहीत, असा निर्णय न्यायालयाने दिला.





























































