
>> मनोहर काणेकर
आत्माराम वि. नाटेकर हा माझा सर्वाधिक प्रसन्न मित्र आहे. सदोदित हसतमुख असलेला. आहे-नाहीची त्याला काळजी नाही, बेपर्वा आहे असे नाही. पण त्याच्याकडे पाहिल्यावर चिंता म्हणून कधी दिसत नाही. तो ती दाखवत नाही. देणारा आणि न देणारा याची जंत्री त्याच्या मनात आहे. भोळ्या स्वभावाच्या माणसाला लुच्चा फसवतो. तसे फसण्याचे प्रसंग त्याच्यावर आले आणि त्याने ते लीलया निस्तरले. दुसरा कोणी असता तर त्याची जागा रस्त्यावर असती. या सर्वांतून तो तरला ही सगळी त्याच्यावर झालेली दयाघनाची कृपा आहे.
‘लोकसत्ता’त काम करताना मला तो सहकारी, आगगाडीच्या डब्यातला सहप्रवासी आणि मित्र अशा विविध नात्यांनी लाभला आणि मुख्य म्हणजे प्राणदाता म्हणूनही. आज हे त्याच्यासंबंधी जे लिहीत आहे ते लिहिण्याचे भाग्यही त्याच्यामुळेच प्राप्त आहे. पण दुर्दैव असे की, त्याच्या कोणत्याच आजाराची खबर मला कधी लागली नाही. माझा धीराचा शब्दही त्याच्या कानावर पडला नाही, ही बाब मला सतत डंख करीत राहिली आहे, राहणार आहे. प्रत्येक घटना, प्रसंग नियतीच्या हाती असून ती तो हाताळत असते.
हे सगळे सांगायचे आहे ते त्याने प्रकाशित केलेल्या ‘सुदैव’ या पुस्तकाच्या निमित्ताने. हे एक अनुभव कथन आहे. आजूबाजूला सर्वत्र अंधार दाटून राहिला आहे, जिथे तिथे खाचखळगे आहेत आणि त्यातून वाट काढीत जायचे तर काम कठीण असते हे सर्वांना ज्ञात आहेच. अगदी अचानक मरणप्राय आजार उद्भवतो आणि पुढे काय असा प्रश्न पडतो आणि रसाळ वाणीच्या सामर्थ्याने जोडलेली वानरसेना खडी होते… आणि चमत्कार होतो त्या चमत्काराची ही कहाणी. ही कहाणी हे शिकवते की, हुद्दय़ाच्या जोरावर माणसं तोडू नका तर जोडा. भले ताटातले देऊ नका, पण कोणाच्या पुढय़ातले ताट हिसकावू नका, हा जणु आत्मारामाचा आत्मभान असलेला संदेश आहे. कारण दारिद्य्राचे चटके त्याने अनुभवले आहेत.
या आजारातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याने जोडलेले मित्र कोणत्याही वेळेला कसलीही तमा न बाळगता धावून येतात, ही त्याची सर्वाधिक मोठी कमाई आहे. ते त्याला इथे तिथे नेतात. ना पावसाची चिंता की अन्य कसली? हिंदुजात दाखल करतात आणि मग हिंदुजाचे मुख्य डॉ. हेमंत बी. टोणगावकर यांचे कसे अनमोल साह्य होते, तिथला सुरक्षा रक्षक राजू देसाई यांची त्याला कशी साथ लाभते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण भेटीला कसे येतात? या सर्वांच्या योगदानाची महती आणि दशरथ परब, प्रकाश पोळ, विष्णु सकपाळ, सुनील करावडे, सखाराम देसाई या सर्व सेवातत्पर मित्रांची साथ लाभते आणि ते या मित्राला संकटमुक्त करण्यासाठी कसकसे प्रयत्न करतात याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. कधी कधी जवळ पैशाच्या राशी असल्या तरी जे काम होत नाही ते आत्माराम नाटेकरच्या नुसत्या शब्दाने होते, ही त्याच्या तोंडून बाहेर पडणाऱया शब्दाची ताकद आहे . कोकणी माणसाबद्दल, त्या भूमीबद्दल त्याच्या मनात जिव्हाळा आहे आणि म्हणून गद्देपंचविशीतले पंचतंत्र कोकणी माणसालाही त्याच्याविषयी अपार प्रेम आहे. कितीएकांचे आशीर्वाद त्याने मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचेही साह्य त्याला लाभले आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो यातून सहिसलामत मोकळा झाला, हिंडू फिरू लागला. त्यात त्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही आहे. हे बळही मोठेच आहे. पण वाणीचे बळ त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे.
या सगळ्यांत अस्मिता वहिनींचे धाष्टर्य़ कमालीचे काwतुकास्पद आहे. सहचारिणी कशी असावी त्याचा त्या आदर्श आहेत. एका सामान्य गावातली मुलगीदेखील इतकी धीराची असावी आणि ती माझ्या या मित्राला लाभावी, मंदार, प्रणव या दोघांसारखे प्रेमळ आणि गुणी पुत्र लाभणे हेही पुण्य आहे आणि घराण्याचे संचित आहे. ही नियतीची देणगी आहे. हे सुख त्याच्यासाठी खूप आहे. ही साठा उत्तराची सुफळ कहाणी त्यात सामील असलेल्यांचा मोलाचा सहभाग दाखवत जशी सुरू होते तशी आनंदाचे निधान बनून संपते.
सदैव
लेखक : आत्माराम नाटेकर
प्रकाशक : मे. क्लासिक, इंटरप्रायजेस
पृष्ठे : 32, मूल्य : रुपये 50/-





























































