
>>साबीर सोलापुरी
रंग सारे खेळताना जीवनाची सांज कशी होते हे नाही कळत. पाखरांची सांजगाणी मग विराणी वाटू लागतात. दिवेलागणीपासून सांज अधिक गडद गहिरी होत जाते. ही सांज अंधारून आली की मनाचा होतो पाचोळा तरी कमी नाही होत तिचा लळा. तिन्हीसांज प्रियकर-प्रेयसीसाठी कठोर प्रतीक्षेची वेळ… जिवलगाला अंतर्बाह्य व्याकूळ करणारी वेळ… तगमग, घालमेल वाढविणारी वेळ… सांज बागेत फिरण्याचा निर्मळ आनंद देणारी वेळ… सांज भक्तिरूप वेळ. गावावर अलगद उतरणारी सांज उदास करणारी असली तरी तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटू लागतं. मावळतीला ढग कुठून तरी तरंगत येतात. क्षितिजात मिसळून जातात. आभाळ विविध रंगांनी माखून जाते.
आठवणींच्या गावावरती सांज उतरली…
किती पाखरे, थव्याथव्याने, घरी परतली!
असा तरल, हळवा शेर लिहिणारे मुंबईचे सदानंद डबीर हे मराठी गझलेच्या प्रांतातील जुनेजाणते, चिंतनशील, गझलकार आहेत. त्यांचं ‘सांज’ हे गझल, गीते, कवितांचं अतिशय दर्जेदार, सर्वांगीण देखणं चौदावं पुस्तक नुकतेच प्रकाशित झालंय. वयाच्या 84 व्या वर्षीही त्यांची काव्यसाधना सुरू आहे. फुलांवर दवाचे ओलसर गाणं लिहावं तसंच त्यांचं सृजनगाणं अजूनही नवी ओळख, नवी हुरहुरू नवं गाणं सुरूच आहे.
गझलेची नशा चढल्याशिवाय, आयुष्याला भिडल्याशिवाय गझल लिहिता नाही येत. डबीर हे आयुष्यातील अनुभूतीला रोज नव्यानं भिडणारे गझलकार आहेत. अनुभवांचं अस्तर काढून त्याचे पापुद्रे उलघडून तळाचा नवा नवा शोध ते घेत असतात. त्यांच्या ठायी नावीन्याची ओढ आहे. आयुष्य प्रश्नांकित असले तरी त्याला भेटण्यासाठी ते आतूर असतात.
आयुष्याला रोज नव्याने भिडतो आहे
रोज नव्याने तीच गझल लिहितो आहे
सूर्याचा तारा गझलकारात वितळला की गझलेशी जन्मांजन्मांतरीचं नातं निर्माण होतं. सांजरंग क्षितिजाचा गारुड करतो. क्षितिजावर जीव जडू लागतो. क्षितिजावर जीव जडणं ही काय साधी गोष्ट नसते. कैकजन्मांचे सूर्यास्त बघावे लागतात. गीत असो की गझल सदानंद डबीरांच्या बहुतांशी रचनांवर सांजेची छटा पसरलीय, हा शेर पाहा.
हा सांजरंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे
सूर्यास्त किती जन्माचे, माझ्या बघतो आहे
किंवा
सावल्यांच्या पालखीतून गात आला
सांजवेळी, मारवा दारात आला
सांजेच्या गलबल्यातून जेव्हा डबीरांची गझल बाहेर येते तेव्हा ती अधिक समाजाभिमुख होत जाते. ती जीवनाचं, समाजाचं नवं आकलन मांडू लागते. त्यातून अस्वस्थ करणारं दुःखाचं, सत्याचं रूपही प्रकट होत जातं. सत्य अनाथासारखे असते. त्याला कुणीच वाली नसतो. आपल्याजवळच्या माणसालासुद्धा सत्य बोललेलं अजिबात खपत नाही, रुचत नाही. सत्याकडं पाठ फिरवणं म्हणजे लुच्चेगिरीच असते. दुःखाला मनात ठेवून वावरणारा माणूसच जगात सुखी राहू शकतो. कल्पना अन् आशयाच्या अंगानंही डबीर यांचा हा शेर नितांतसुंदर आहे.
डोळे पुसून रुमाल जसा ठेवावा खिशात
ते दुःख ठेवले मी, घडी घालून मनात
रचनाकार जेव्हा पावसाच्या चेहऱयावर आसवांची गाणी लिहितो ती गाणी समग्र दुःखाचीच होऊन जातात. आकांत निसर्गाचा असो वा जीवनमूल्यांच्या ऱहासाचा, तो निर्मिकाला स्वस्थपणे जगू नाही देत. पावसाच्या चेहऱयावर आसवांनी लिहिणं हे काम प्रतिभावंतच करू जाणो!
अक्षरं अदृश्य होती, तीच मी गुणगुणत गेलो
पावसाच्या चेहऱयावर आसवांनी लिहित गेलो
जगण्याची कितीही वाताहत होत असली तरी लोकमनात काव्यातून सदैव झिरपत राहणं हे प्रतिभावंतांच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे. मातीची घागर जसजशी झिरपत जाते, तशी पाण्याची गोडी अन् शीतलता वाढतच जाते. कवीचं संगळं असणं, जगणं कवितेतून असंच उमटत राहतं. त्याचप्रमाणे अस्सल कविता खोलवर झिरपत जाते.
एकेक घडी जगण्याची, निसटून चालली आहे
मातीची घागर माझी… झिरपून चालली आहे
कागदोपत्री कायदा सख्त दिसतो, पण त्यातही हजारो पळवाटा निर्माण करणारे काही महाभाग असतातच. भ्रष्टाचाराची वाळवी कायद्याला गिळंकृत करते. याची लागण खालपासून वरपर्यंत झालेली दिसून येते. म्हणून खऱयाला न्याय मिळेलच असं छातीठोकपणे सांगता नाही येत. ज्याला फाशीची शिक्षाच होईल, असं स्पष्ट जनमत असतानाही तोच आरोपी सहीसलामत सुटल्याची कितीतरी उदाहरणं समोर येतात. तेव्हा विश्वासार्हतेला आरपार तडा जातो. कायद्याचा हेतू न्यायाचा असतो. पण तो वाममार्गानं राबविणाऱयाचं काय करायचं? कायद्याच्या या शोकांतिकेवर ते बोट ठेवतात.
भोग इथले दुःख आधी… मग लिही
गझल इथल्या माणसांची… मग लिही!
गझल-हझल, गीत-गीतिका, कविता आदी काव्यप्रकार डबीरांनी जबाबदारीनं हाताळलेत. त्यात कुठलीही कसर ठेवली नाही. ‘वाहवा! ही मस्त आहे शायरी!’ असंच रसिकांनी म्हटलं पाहिजे यात संदेह नाही.
सांज : गझलसंग्रह
गझलकार : सदानंद डबीर
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई
पृष्ठs : 111, मूल्य : रुपये 150/-





























































