
कामावर जाण्यासाठी बस थांब्यावर उभे असलेल्या दोघांचा आज दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. भरधाव कारने धडक दिल्याने ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी येथे घडली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी-एव्हरार्ड नगर बस थांब्यावर सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला. नेहमीप्रमाणे कामावर जाणारे बाबासाहेब काळे (55) आणि एक 60 वर्षांच्या वृद्धासह अन्य नागरिक बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. त्याच वेळी वेगात असलेल्या हुंडाई एसेन्ट या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी कार पदपथावर चढून थेट प्रवाशांमध्ये घुसली. प्रवांशांना धडक दिल्यानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसदेखील काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ या अपघातात जखमी झालेल्या दोघांना बाहेर काढले, मात्र बाबासाहेब काळे या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य 60 वर्षीय एक अनोळखी इसमाला तत्काळ शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचादेखील मृत्यू झाला.
दरम्यान, धडक देणारी कार कुर्ला नेहरूनगर परिसरातील एका गल्लीत उभी असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कार ताब्यात घेतली. मात्र कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चालकाने कार पार्क करून तेथील दुसऱ्या कारवरील कपडा काढून तो आपल्या कारवर टाकला. चालकाने आयडिया केली, पण प्रत्यक्षदर्शिंनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कार जप्त केली.
पळून गेलेला चालक अल्पवयीन मुलगा निघाला
भरधाव कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तसेच अपघात करून पळून गेलेला चालक पोलिसांना अखेर सापडला. तो चालक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा असून सकाळी एका मित्रासोबत जॉय रायडिंगला निघाला होता. तेव्हा वेगात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.





























































