घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या घरी जाऊन प्रियकराची आत्महत्या

फोटो प्रातिनिधीक

जालौनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. या घटनेची चौकशी करून पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच घटनेत वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील दादरी गावाजवळ घडली आहे. याच गावात राहणाऱ्या मनोज राजपूत याचे त्याच गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम संबंधाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. शनिवारी सकाळी तो त्याच गावात राहणाऱ्या त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला. यानंतर तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला. त्याच रागात त्याने स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी घराकडे धावले. त्यांना खोलीत रक्तबंबाळ झालेला मुलाचा मृतदेह आणि शेजारी पिस्तूल आढळून आले.

या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच आटा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अर्जुनसिंग फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी फॉरेन्सिक टीमला बोलवून पुरावे गोळा करण्यास सांगितले. या प्रकरणी कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मात्र काल्पीचे सीओ डॉ. देवेंद्र पचौरी यांचे म्हणणे आहे की, प्रथमदर्शनी ही आत्महत्या आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती मिळेल. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जाईल.