अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही, पण… ब्रिजभूषण ‘डब्ल्यूएफआय’मध्ये नवीन भूमिकेसाठी इच्छुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आल्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेतील एकाधिकारशाहीला मोठा धक्का बसला आहे. आगामी 7 मे रोजी होणारी राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही असे ब्रिजभूषण सिंह यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र ‘डब्ल्यूएफआय’मध्ये नवीन भूमिकेसाठी आपण इच्छुक असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

कुलिंग ऑफ पिरियडचा फटका
‘डब्लूएफआय’चे महासचिव व्ही.एन. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची आपत्कालीन सर्वसाधारण परिषद व कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या आगामी निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. ब्रिजभूषण यांनी अध्यक्ष पदाच्या चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यांनी 12 वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे. कुलिंग ऑफ पिरियडच्या नियमानुसार आता त्यांना मोठय़ा पदावर कार्यरत होता येणार नाही. आता त्यांचे वय 66 वर्षे आहे. त्यांना चार वर्षे कुलिंग ऑफ पीरियडचा सामना करावा लागेल. त्यानंतर त्यांचे वय 70 होईल. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह पुन्हा ‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र आपण ‘डब्ल्यूएफआय’मध्ये नव्या भूमिकेत राहणार असल्याचे संकेत ब्रिजभूषण सिंह यांनी दिले आहेत. म्हणजेच ते संघटनेत पाच सदस्यीय कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून राहू शकतात.

‘राष्ट्रीय कुस्ती महासंघावर देखरेख समितीची नेमणूक केल्यानंतर मला तीन आठवडे ‘डब्ल्यूएफआय’च्या कामकाजापासून दूर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर हा कालावधी सहा आठवडय़ांचा करण्यात आला. मग मी हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व देखरेख समिती यांच्या सुनावणीला उपस्थित राहिलो होतो. त्यामुळे मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. आता मी ‘डब्ल्यूएफआय’चा पदाधिकारी म्हणून कामकाज करु शकतो.’
– ब्रिजभूषण शरण सिंह