
अनेक जणांना तर फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर हवा असतो आणि त्यासाठी ते वाट्टेल तेवढे पैसेही मोजण्यास तयार असतात. अशाच एका हौशी व्यक्तीला भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा (BSNL) एक नंबर एवढा आवडला की त्याने लाखोंची बोली लावून तो खरेदी केला. या व्हीआयपी नंबरसाठी तब्बल 2.4 लाखांची बोली लागली आहे. विशेष म्हणजे हा नंबर खरेदी करणारा एक बटाटे विक्रेता आहे.
राजस्थानमधील कोटा शहरात बटाट्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा (BSNL) व्हीआयपी नंबर खरेदी केला आहे. यासाठी त्याने 2.4 लाख रुपये मोजले आहेत. या नंबरमध्ये एवढे काय खास आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेलच.
व्हीआयपी नंबरमध्ये एक गोष्ट खास असते ती म्हणजे तो नंबर सहज लक्षात राहू शकतो. तसेच यामुळे असा नंबर असणारी व्यक्तीही खास होऊन जाते. यामुळेच बटाटे विक्रेत्याने बीएसएनलचा व्हीआयपी नंबर लाखांची बोली लावून खरेदी केला. कोटा शहरातील व्यापाऱ्याने जो नंबर खरेदी केला आहे त्याचे शेवटचे सात अंक 7000000 असे आहे.
बीएसएनएल आपल्या वेबसाईटवर फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबरचा लिलाव करते. XXX7000000 हा नंबरही कंपनीने बोलीसाठी वेबसाईटवर टाकला होता. 20 हजारांपासून या नंबरसाठी बोली सुरू झाली होती ती 2.4 लाखांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे ज्या व्यापाऱ्याने हा व्हीआयपी नंबर घेतला त्या व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी 1 लाख रुपयांची बोली लावून एक व्हीआयपी नंबर घेतला होता.




























































