
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आपला पक्ष 2023 मध्ये होणाऱ्या सर्व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. बसपा कोणत्याही पक्षाशी आघाडी किंवा युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वाढदिवसानिमित्त लखनऊमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभेसह सर्व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह ज्या राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढणार आहोत.तसेच लोकसभा निवडणुकाही पक्ष स्वबळावर लढवेल, आम्ही कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मायावती यांनी समाजवादी पक्ष, भाजप, काँग्रेस पक्षांवरही टीका केली. काँग्रेस आणि भाजपने मंडल आयोग लागू केला नसल्याने वंचित घटकांना त्यांचे हक्क मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीनाही आरक्षण मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी जनतेने बसपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बसपा त्यांना आत्मसन्मान मिळवून देईल, असेही त्यांनी सांगितले. जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत साशंकता असल्याने निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली.




























































