
सैन्यदलासाठी उपयोगी उपकरणांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केला. स्वदेशी उद्योगांसाठी या अर्थसंकल्पात 68 टक्के भांडवल संपादनाची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. ही तरतूद 2021-22 मध्ये 58 टक्के होती.
संरक्षण संशोधन व विकासाचे क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि स्टार्ट अप्स साठी खुले करणार असून त्यासाठी एकूण संशोधन व विकास तरतुदीच्या 25 टक्के रक्कम राखून ठेवली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
सैन्यदलासाठी उपकरणे व मंचाची संरचना व विकास करण्यासाठी खाजगी उद्योगांना प्रोत्साहित केले जाणार असून त्यासाठी त्यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि इतर संस्थांशी सहकार्य करणे अपेक्षित आहे. विशेष हेतूसाठी उभारलेल्या SPV मार्फत हे सहकार्य करता येईल, असे त्या म्हणाल्या. मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.




























































