ही वेळही निघून जाईल! कर्करोगानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला जडला कोस्टोकॉन्ड्रायटीस आजार, वेदनेने कळवळतेय

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal) ही नुकतीच कॅन्सरमधून बरी झाली. गेल्या वर्षी तिने आपल्याला स्टेज-4चा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. मात्र आता ती यातून पूर्णपणे बरी झाली असून घरी परतली आहे. कॅन्सरमधून बरी झालेल्या छवीला आता नवीन आजार जडला आहे. सध्या ती कॉस्टोकॉन्ड्रायटीसचा (Costochondritis) सामना करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने याबाबत माहिती दिली आहे.

कॉस्टोकॉन्ड्रायटीस म्हणजे ब्रेस्टबोनला जोडलेल्या कार्टिलेजमध्ये सूज येणे होय. शेवटच्या दोन बरगड्या सोडून इतर सर्व बरगड्या ब्रेस्टबोनला कार्टिलेजने जोडलेल्या आहेत. या स्वयं-मर्यादित सूजेमुळे छातीत कळ मारते किंवा वेदना होतात, जे कॉस्टोकॉनड्रायटिसचे कॉमन लक्षण आहे, असे समजले जाते. हाच आजार आता छवीला जडला आहे.

मार्केटमध्ये मी नवीन आजार घेऊन आलेय. याला कॉस्टोकॉन्ड्रायटीस म्हणतात. किती भन्नाट शब्द आहे ना? रेडिएशन किंवा ऑस्टियोपेनियासाठी मी घेतलेले इंजेक्शन्स यामागील कारण असू शकते. तसेच मला शंका आहे की खोकल्यामुळे तर हे झाले नसेल ना. यामागे अनेक कारणं असू शकतात. मला श्वास घेताना त्रास होतोय. हाताचा वापर करताना, झोपताना, बसताना आणि हसतानाही मला सतत वेदना होत होत्या, असे छवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी नेहमीच याबाबत सकारात्मक नव्हते. अनेकदा मी छातीवर हात ठेऊन जीममध्ये पोहोचायचे. तुम्हाला सर्वांना माहितीय की आयुष्यात कधीतरी आपण पडतो, पडल्यानंतर उठतो आणि मी पडल्यानंतर उठलेय, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

तुम्ही या समस्यांचा सामना करत असाल तर मी तुमच्या वेदना समजू शकते. या लढ्यात तुम्ही एकटे नाहीत. मी सुद्धा तुमच्यासोबत आहे आणि मला माहिती ही वेळही निघून जाईल, असेही छवीने पुढे म्हटले आहे. याआधी छवी मित्तल हिने एप्रिल 2022मध्ये आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रेडिएशन थेरपीही देण्यात आली आणि मग यातून ती पूर्णपणे बरी झाली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या छवीचे स्वत:चे युट्यूब चॅनेलही असून तिचे पावणे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्सही आहेत.