नूपुर शर्माविरोधात संगमनेरमध्ये गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Nupur-Sharma

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून जगभरातील मुस्लिम अनुयायांच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर संगमनेरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संगमनेरातील मुस्लिम समाज निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर शुक्रवारी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलताना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकारानंतर केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम धर्मियांनी शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावानंतर भाजपाने शर्मा यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.

या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर संगमनेरात निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांशी चर्चा करून त्यांना मोर्चा काढण्यापासून परावृत्त केले. मात्र, मुस्लिम धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून नूपुर शर्मा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखविली. त्यानुसार शहरकाजी सय्यद अब्दुल रकीब अब्दुल वहाब पीरजादे यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्या विरोधात कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.