सेलेब्रिटी चॉइस – भूमिका, पुस्तकं आणि मी

>> सयाजी शिंदे

लहानपणी आमच्या घरात माझी बहीण सतत वाचत असायची. त्यावेळी मी वि. स. खांडेकरांची, गोनीदांची पुस्तकं वाचली, पण खूप चिकाटीने वा आवड म्हणून असं वाचन तेव्हा केलं नाही. मात्र नंतर जेव्हा मराठी साहित्य हाच विषय अभ्यासाला होता तेव्हा मात्र विद्रोही कविता वाचायला फार आवडायचं. ‘पाचवा’ नावाची कादंबरी तेव्हा वाचली होती आणि खूप आवडलीही होती. त्याचदरम्यान नाटकाची, एकांकिकांची आवड निर्माण झाली आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या स्वरूपाचं वाचन होत गेलं. तेव्हा ‘अभिनय साधना’, ‘भूमिकाशिल्प’ ही के. नारायण काळे यांची पुस्तकं मला फार उपयोगी ठरली. या पुस्तकांनी माझं आयुष्य घडवलं असं मी म्हणेन. माझी कलाकार म्हणून ओळख निर्माण करणारं नाटक ‘झुलवा’ करताना मी राजन गवस यांची ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ ही पुस्तकं वाचली. त्यांचं ‘हरण’ हे पुस्तक माझ्या आवडीचं.

माझ्या भूमिकेसाठी एका बाजूला वेदना देणारी तरीही आवडणारी अशी ही पुस्तकं मी असंख्य वेळा वाचली. त्याच वेळी विजय तेंडुलकर, सतीश आळेकर यांची नाटकं मी खूप पाहत असे. त्यानिमित्त तेंडुलकरांची सगळीच्या सगळी पुस्तकं वाचली. त्यांचं ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ निव्वळ अप्रतिम! तेंडुलकरांच्या प्रत्येक नाटकातून, लिखाणातून सामाजिक भान रुजलं गेलं आहे हे नाकारता येणार नाही. वसंत कानेटकरांचंही साहित्य वाचलं. ‘अश्रंtची झाली फुले’ आजही पुन्हा वाचायला आवडतं. आजही या भूमिकांच्या आणि पुस्तकांच्या प्रेमात मी आहे.

या सगळ्या पुस्तकांच्या मांदियाळीत सगळ्यात आवडणारे लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे. नेमाडेंचं ‘कोसला’ कितीतरी वेळा वाचलं असेल. नेमाडेंचा ‘देखणी’ हा कवितासंग्रह तरल संवेदना मांडणारा वाटतो. याबरोबरच आणखी एक आवडणारे लेखक म्हणजे रंगनाथ पठारे. त्यांची ‘ताम्रपट’, ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही माझी अत्यंत आवडीची पुस्तकं. विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, रंगनाथ पठारे, नेमाडे हे समकालीन वास्तव मांडणारे लेखक आहेत आणि म्हणूनच त्यांचं साहित्य वाचणं हा वेगळा अनुभव ठरतो. याशिवाय वेगळं वाचन म्हणून ना. धों. महानोर, प्रकाश होळकर यांच्या कविता आपसूकच साद घालतात. महानोरांचा ‘रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह कधीही हातात घ्यावा आणि वाचावा असा, तर प्रकाश होळकर यांचं शेती, ग्रामीण बाज, भाषा, परंपरा जपणारं काव्य मनाला भुलवतं. त्यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाचा मी आवर्जून उल्लेख करीन. अप्रतिम अशा या कविता आहेत.

दाक्षिणात्य चित्रपट करतानाही तिकडच्या साहित्याचा थोडासा का होईना, अभ्यास करता आला, अनुभव घेता आला. सुब्रमण्यम भारथी या तिकडच्या संतकवीची भूमिका करताना त्यांचं अप्रतिम साहित्य अनुभवता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुस्तकं वाचताना सगळ्यात जास्त भावतात त्या कविता. विशेषतŠ निसर्गकाव्यं. या कवितांसारख्या तरल संवेदना आपण निसर्गाविषयी जपल्या पाहिजेत.