असंतुष्ट मुले रायफल कुठे वळवतील हे सांगू शकत नाही! ‘अग्निपथ’वर  सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्र डागले. अग्निपथ योजना वेळीच मागे घ्या, मुलांचा विचार करा. असंतुष्ट मुलांच्या हातात रायफल मिळाली तर ती मुले रायफल कुठल्या दिशेला वळवतील, हे सांगता येणार नाही. केंद्र सरकार अत्यंत उद्दाम वागतेय. काहीतरी वाईट घडेल, मग सरकार बॅकफूटला येईल, असा घणाघात मलिक यांनी केला.

शेतकरी आंदोलनापासून मलिक यांनी केंद्रावर वेळोवेळी जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने गेल्या महिन्यात कंत्राटी सैन्यभरतीची अग्निपथ योजना अंमलात आणली आहे. त्यावरून देशभर आगडोंब उसळला. त्यानंतरही केंद्राने ती योजना ’जैसे थे’ ठेवली आहे. त्यावरून मलिक यांनी सोमवारी जोरदार टीकास्र डागत मोदी सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबतही भाष्य केले. मी तेव्हा शेतकऱयांबद्दल बोललो, ते सरकारच्याही हिताचे होते. त्यामुळे शेतकरी आंदोलन झाले नसते. 700 शेतकरी मरण पावले. मात्र सरकारने त्या शेतकऱयांप्रती साधा शोकसंदेशही पाठविला नाही. नंतर माफी मागून वादग्रस्त विधेयक मागे घेतले. हे चुकीचे आहे, अशा शब्दांत मलिक यांनी केंद्राच्या कारभाराची पोलखोल केली.

दबावाखाली राहणार नाही,राजीनामा खिशात ठेवलाय!

केंद्रावर बेधडक टीका करणाऱया मलिक यांनी कुठल्याही दबावाखाली काम करणार नसल्याचेही सुनावले. मी कोणाच्याही दबावाखाली काम करीत नाही. मी ज्यावेळी पहिल्यांदा टीका केली होती, तेव्हापासूनच खिशात राजीनामा ठेवला आहे. ज्या दिवशी पंतप्रधान मोदी सांगतील, त्याच दिवशी पद सोडून निघून जाईन. मला हटवावे लागणार नाही, असा टोला मलिक यांनी मोदींना लगावला.