भंगार विकून केंद्र सरकारने कमावले 252 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत भंगार विकून केंद्र सरकारने 252.25 कोटींचा महसूल मिळवला आहे. ‘जीवन सुलभता’ सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या आहेत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्ही.श्रीनिवास यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत सुमारे 3 लाख लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (DARPG) विभागाचे सचिव श्रीनिवास यांनी सांगितले की, यापैकी 4500 सार्वजनिक तक्रारी कैद्यांशी संबंधित होत्या. “ही मोहीम खूप मोठी आणि व्यापक आहे. जगण्याच्या सुगमतेसाठी सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया शिथिल केल्या आहेत. प्रत्येक पावलाचा हिंदुस्थानातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे. विशेष मोहीम 2.0 ही 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत दूरची कार्यालये, परदेशातील मिशन्स, केंद्र सरकारशी संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये आणि इतर संस्थांमध्ये आयोजित केली जात आहे.

राजस्थान केडरचे 1989 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी श्रीनिवास म्हणाले की, “61,532 ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, कचऱ्याची विल्हेवाट लावून सरकारने 252.25 कोटी रुपये कमावले. या मोहिमेअंतर्गत 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र साफ करण्यात आले. तीन आठवड्यात ही मोहीम पूर्ण करण्यात आली आहे.

श्रीनिवास म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांत ही विशेष मोहीम मोठ्या प्रमाणावर चालवण्यात आली. यामध्ये हजारो अधिकारी व नागरिक सहभागी झाल्याने त्यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबविले आहे. यामध्ये सर्वांनी मिळून हातभार लावला आहे. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली.