Census 2027 – जनगणनेसाठी अधिसूचना जारी; स्वतंत्र हिंदुस्थानात पहिल्यांदाच जात नोंदवणार, 40 प्रश्न विचारले जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने शुक्रवारी आगामी लोकसंख्या जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 40 प्रश्नांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच सामान्य लोकसंख्या जनगणनेदरम्यान नागरिकांच्या जातीची नोंद घेतली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य सर्व नागरिकांना त्यांची जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना कायदा, 1948 अंतर्गत ही अधिसूचना जारी केली असून रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी या प्रश्नांना मंजुरी दिली आहे. जनगणना अर्जातील 10 व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ जात असा रकाना देण्यात आला आहे. हा रकाना सर्वांसाठी खुला असेल. नागरिक स्वतःहून जी जात सांगतील, तीच जात प्रगणक नोंदवून घेतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच याआधी जुलै महिन्यात 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या जनगणनेच्या पूर्वचाचणीत हीच पद्धत वापरण्यात आली होती. तीच आता अंतिम जनगणनेत लागू केली जात आहे.

या वेळच्या जनगणनेत केवळ लोकसंख्येची आकडेवारी नसेल, तर नागरिकांच्या डिजिटल आणि आर्थिक स्थितीचीही माहिती घेतली जाईल. जनगणनेदरम्यान उपलब्ध असल्यास आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सची याची माहिती घेतली जाईल. बँक खात्यांची एकूण संख्या, साक्षरतेसोबतच डिजिटल साक्षरता, तसेच रोजगाराचे स्वरूप आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरले जाणारे प्रवास साधन, कोविड-19 ची लस घेतलेली आहे की नाही आदी प्रश्नही विचारले जाणार आहेत.

दरम्यान, देशातील बर्फाच्छादित आणि दुर्गम भागांमध्ये ही प्रक्रिया लवकर सुरू होत आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील दुर्गम भागात 17 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल. तर उर्वरित संपूर्ण देशात फेब्रुवारी 2027 मध्ये ही जनगणना पार पडेल.

40 प्रश्नांची संपूर्ण यादी –

1. व्यक्तीचे नाव

2. कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते

3. लिंग

4. जन्मतारीख आणि वय

5. सद्य वैवाहिक स्थिती

6. विवाहाच्या वेळचे वय

7. पती/पत्नीचे नाव

8. घोषित राष्ट्रीयत्व

9. धर्म

10. अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / जात

11. वडिलांचा तपशील

12. आईचा तपशील

13. अपंगत्व (दिव्यांगत्व)

14. मातृभाषा आणि ज्ञान असलेल्या इतर भाषा

15. साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती

16. शिक्षण संस्थेतील उपस्थिती/शिक्षणाची स्थिती

17. सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा/विषय

18. गेल्या एका वर्षादरम्यान कधीही काही काम केले आहे का?

19. आर्थिक उपक्रमांची श्रेणी

20. व्यवसाय / पेशा

21. उद्योग, व्यापार किंवा सेवेचे स्वरूप

22. कामगाराची श्रेणी

23. बिगर-आर्थिक उपक्रम

24. कामाच्या शोधात आहात किंवा कामासाठी उपलब्ध आहात का?

25. कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याची स्थिती

26. जन्मस्थान

27. शेवटचे रहिवास स्थान

28. स्थलांतराचे कारण

29. शेवटच्या स्थलांतरानंतर या गावात/शहरात राहण्याचा कालावधी

30. कायमचा निवासी पत्ता

31. सध्या हयात असलेल्या मुलांची संख्या (केवळ सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त राहणाऱ्या महिलांसाठी)

32. आतापर्यंत जन्मलेल्या एकूण हयात मुलांची संख्या

33. गेल्या एका वर्षात जन्मलेल्या हयात मुलांची संख्या

34. कोविड-१९ लसीकरणाची जागा

35. एकूण बँक खात्यांची संख्या

36. मोबाईल नंबर (उपलब्ध असल्यास)

37. आधार क्रमांक (उपलब्ध असल्यास)

38. मतदार ओळखपत्र क्रमांक (उपलब्ध असल्यास)

39. पासपोर्ट क्रमांक (भारतीय पासपोर्टधारक असल्यास)

40. ड्रायव्हिंग लायसन्सची उपलब्धता