Video – चंद्रपुरातील महाराष्ट्र बँकेच्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

चंद्रपूर पोलिसांनी 19 मार्च रोजी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावातल्या महाराष्ट्र बँकेच्या दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे. या दरोड्यात 7 लाख रु.  रोख तर 93 ग्रॅम दागिने लंपास झाले होते. महिनाभरात राज्यात काही ठिकाणी अशाच घटना झाल्या होत्या. सर्व घटनांत दरोड्याची विशिष्ट पद्धत वापरली होती.

त्याचा अभ्यास करत उत्तरप्रदेशातील बदायु जिल्ह्यातील ककराला गावात पोलिसांनी तिथल्या पोलिसांच्या मदतीने अभियान राबविले. विविध पथके तयार करत आरोपींवर पाळत ठेवली गेली. त्यातील 2 मुख्य आरोपीना अटक करण्यात यश आले. ककराला गावातील आंतरराज्य गुन्हेगार नवाबुल हसन आणि साथीदार दानवीरसिंग याला अटक झाली.

अटक करतेवेळी आरोपीनी केलेल्या हल्ल्यात 2 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. मुख्य आरोपीच्या घरून 2 किलो 800 ग्रॅम वजनाचे 1 कोटी 1 लाख 10 हजार रु. चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टेमुर्डा बँक दरोड्यात सहभाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 2 तर चंद्रपूर शहरालगतच्या पडोली गावातील 1 अशा एकूण 5 आरोपीना या गुन्ह्यात अटक झाली आहे. ककराला गावातील आरोपीच्या घरून बोलेरो गाडी-अर्धवट जळालेले DVR- सोने मोजण्याची मशीन- ऑक्सिजन सिलिंडर- ATM तोडण्याची हत्यारं- यंत्रसामुग्री- साहित्य यांची मोठी जप्ती झाली आहे.

एकूण 1 कोटी 7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. नवाबुल हसन आणि त्याच्या टोळीने 3 राज्यात 11 दरोडे घातल्याची कबुली दिली आहे. चंद्रपूर न्यायालयाने सर्व 5 आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या टोळीने राज्यात अन्यत्र आणखी काही असे गुन्हे केले का, यासंबंधी तपास केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे व बोबडे यांनी यशस्वी पार पाडली.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या