
मध्य प्रदेश येथील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानातील काही चित्त्यांना अन्यत्र हलवण्यात येणार आहे. कुनोमध्ये दोन टप्प्यांत दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 20 चित्ते ठेवण्यात आले आहेत. त्यातील दोन चित्त्यांच्या मृत्युनंतर उरलेल्यांच्या प्रकृतीबाबत चिंता भेडसावत आहे. त्यात चित्त्यांना फिरण्यासाठी अधिक मोठं वनक्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यातील काहींना राजस्थानात हलवण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव हा आधीपासूनच विचारात घेतला होता. रविवारी उदय या चित्त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय आता वेगाने घेतला जाणार आहे. विभागाने नवीन प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवून दिला आहे.
कुनो हे 748 चौरस किमी परिसरात व्यापलं असून त्यात जास्तीत जास्त 21 चित्ते राहू शकतात. सध्या ही जागा 18 चित्त्यांसाठी योग्य आहे. पण, एका ठिकाणी चित्त्यांची संख्या जितकी कमी, तितक्या जास्त प्रमाणात ते मुक्तपणे वावरू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याशिवाय इतक्या चित्त्यांना एकत्र ठेवणं जोखमीचं ठरू शकतं. त्यामुळे यातील काहींसाठी पर्यायी जागा शोधण्यात येणार असून राजस्थानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. जर राजस्थानमध्ये स्थलांतरण निश्चित झालं तर त्यांना मुकुंदरा हिल्स या व्याघ्रप्रकल्पात हलवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. मात्र, अधिकृतरित्या याबाबत अद्याप सांगण्यात आलेलं नाही.




























































