चेंबूरमध्ये सिलिंडर स्फोटानंतर घर कोसळले, आठ जण जखमी; 11 जणांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर कॅम्प परिसरातील गोल्फ क्लबजवळील एक मजली घरामध्ये सिलिंडर स्पह्टानंतर हे घर चाळीतील दुसऱया घरावर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या 11 जणांची सुटका करण्यात आली, तर आठ जण जखमी झाले. जखमींना गोवंडी शताब्दी, शीव आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

चेंबूर पॅम्प परिसरात सकाळी 7.50 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. तळमजला अधिक एक मजली घरे असलेल्या या भागात मन्नूभाई पटेल या रहिवाशाचे टी/48, घर क्रमांक 4 आहे. तळमजल्यावरील घर त्यांनी मनोज निरभवणे यांना भाडय़ाने दिले असून या भाडेकरूच्या घरात गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने बॅरेक्सचा परिसर हादरून शेजारची चार ते पाच घरे कोसळली. रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या पहिल्या मजल्यावर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यापैकी घरांमध्ये अडकलेल्या 6 जणांसह 11 जणांची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घरांचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेत अशोक अंभोरे, रोहित अंभोरे, विकास अंभोरे, सविता अंभोरे, राहुल कांबळे, पार्थ सिंह, मनोज निरभवणे, सुनंदा निरभवणे जखमी झाले.