छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगड येथील सुकमा या नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या एका सीआरपीएफ जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी रात्री एक वाजता सुकमा जिल्ह्यातील मरईगुडा भागातल्या लिगमपल्ली येथील सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पवर घडली. गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव रितेश रंजन असं आहे. तो रात्री कर्तव्यावर तैनात होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार जवान मृत्युमुखी पडले, तर पाच जण जखमी झाले.

जखमी झालेल्यांची नावं धनंजय कुमार सिंह, राजीव मंडल, धर्मात्मा कुमार आणि मलय रंजन महाराणा अशी आहेत. तर अन्य एका जखमी जवानाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

हा गोळीबार नेमका का झाला, याचा उलगडा अजून झालेला नाही. प्राथमिक माहितीनुसार जवानांमध्ये आपापसातील वादामुळे ही घटना घडली आहे. सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. जवानाद्वारे आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत.