
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चिखली येथील ‘सेक्टर 12’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या 95 दिवसांत 14 मजली इमारत उभी करण्याचा पराक्रम केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच 100 दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. आज चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित सोहळ्यात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिपृत प्रमाणपत्र व पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला. प्राधिकरणाच्यावतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला. ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड गाठण्यात आला. बी.जी. शिर्पे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या पंपनीच्या सुमारे 9 हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम करत ही इमारत उभी केली. अत्याधुनिक ‘प्रीकास्ट आरसीसी’ तंत्रज्ञानामुळे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूपंप प्रतिरोधक असून त्यामध्ये 112 (2 बीएचके) फ्लॅट आहेत. एपूण क्षेत्रफळ 84,722 चौ. फूट आहे.
यापूर्वी मार्च 2026मध्ये ‘पीएमआरडीए’ने 100 दिवसांत इमारत बांधून विक्रम केला होता. मात्र अवघ्या एका महिन्यात पुन्हा स्वतःचेच रेकॉर्ड सुधारत 95 दिवसांचे नवे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील दिग्गज ‘एल अँड टी’ कंपनीच्या नावावर 96 दिवसांत 12 मजली इमारत बांधल्याची नोंद होती. त्यावर आता ‘पीएमआरडीए’ने मात केली आहे. सूत्रसंचालन कविता भिडे यांनी केले. एन.एम. कदम यांनी आभार मानले.
‘‘पीएमआरडीए’च्या सेक्टर-12 येथील गृहनिर्माण प्रकल्पात आम्ही ‘मिशन 95 डेज’ हे मोठे आव्हान स्वीकारले होते. अभियांत्रिकी कौशल्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर 14 मजली इमारत केवळ 95 दिवसांत पूर्ण करून आम्ही हा टप्पा गाठला आहे. ही यशस्वी अंमलबजावणी प्रामुख्याने ‘3-एस प्रीफॅब टेक्नॉलॉजी’, ‘झिरो लॅग शेडय़ुलिंग’ आणि अहोरात्र चालणाऱया ‘थ्री-शिफ्ट वर्पिंग’ मॉडेलवर आधारित आहे.’’
– रिनाज पठाण, मुख्य महानगर अभियंता – पीएमआरडीए

























































