
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सीमावादावरून चीनने पुन्हा उलटय़ा बोंबा मारल्या आहेत. पूर्व लडाखमधील सीमावादाला हिंदुस्थानच जबाबदार असल्याचा आरोप चीनचे संरक्षणमंत्री वाई फेंगे यांनी रविवारी सिंगापूरमध्ये केला. हिंदुस्थानने मोठय़ा प्रमाणावर जवानांना चीनच्या हद्दीत घुसखोरी करायला लावली. त्यामुळेच एलएसीवर चीन आणि हिंदुस्थानमध्ये तणाव निर्माण झाला, असा दावा फेंगे यांनी केला. एलएसीवरील शांतता दोन्ही देशांच्या हिताची आहे. येथील तणाव संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्कर कमांडर पातळीवर चर्चेच्या 15 फेऱया झाल्या आहेत. दोन्ही देश शांततेसाठी प्रयत्न करीत आहेत, अशी विधाने चीनचे संरक्षणमंत्री फेंगे यांनी केली. ते सिंगापूरमध्ये आयोजित ‘शंगरी-ला-डायलॉग’ परिषदेमध्ये बोलत होते.




























































