चीन तयार करतोय कृत्रिम सूर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीन स्वच्छ ऊर्जास्रोतासाठी कृत्रिम सूर्य तयार करण्याच्या तयारीत आहे. खऱ्या सूर्यापेक्षा कृत्रिम सूर्य सहापटीने जास्त तप्त असेल. चीनचा सूर्य दहा कोटी डिग्री सेल्सियसपर्यंत उष्णता निर्माण करू शकेल.

चीनच्या इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा फिजिक्सकच्या मते कृत्रिम सूर्याची चाचणी सुरू आहे. त्याला एक्सपेरिमेंटल एडवान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामक (ईस्ट) असे नाव दिले आहे. त्याची रचना अगदी खऱ्या सूर्यासारखी आहे. सूर्यमंडळाच्या मध्यभागी असलेल्या कोणत्याही अन्य ताऱ्याप्रमाणे कृत्रिम सूर्य ऊर्जेचा साठा उपलब्ध करून देईल. याआधी कृत्रिम चंद्र तयार करण्याची योजना चीनने आखली आहे. 2022 पर्यंत चीनचा कृत्रिम चंद्र आसमंतात दिसेल.

मशीन सुरू करण्यास 11 लाख रुपये खर्च
‘ईस्ट’ म्हणजे एकप्रकारची मशीनच जणू. मध्यभागी गोलाकार बॉक्स (डोनट) असून त्यामध्ये न्यूक्लीअर फ्युजन करून उष्णता तयार होते. मशीन दिवसभर सुरू करण्याचा खर्च अंदाजे 11 लाख रुपये इतका आहे. मशीन सध्या चीनच्या अन्हुई प्रांतातील साइंस बेटावर ठेवली आहे.

पृथ्वीसाठी ऊर्जेचा स्रोत
कृत्रिम सूर्याच्या माध्यमातून पृथ्वीवर विपुल ऊर्जास्रोत निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान म्हणजे स्वच्छ ऊर्जेचा स्रोत ठरेल. सध्या जगभरात न्यूक्लिअर फिजनद्वारे ऊर्जा निर्माण केली जाते. त्यामुळे तयार होणारा आण्विक कचरा अत्यंत विषारी ठरत आहे.