
मतचोरी आणि निवडणूक घोटाळय़ांच्या विरोधात आज आंदोलनाचा वणवा भडकला. मोदी सरकारची दडपशाही झुगारून कॉक्रोच पार्टी आणि विद्यार्थी संघटनांसह विरोधी पक्षांचे हजारो नेते, कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले. ‘ज्ञानेश कुमार चले जाव’, ‘व्होट चोर गद्दी छोड…’ अशा घोषणा देत आंदोलकांनी जंतर मंतरच्या दिशेने कूच केले. त्यामुळे घाबरलेल्या सरकारने पोलिसांना पुढे करत दडपशाहीचा वरवंटा फिरवला. अक्षरशः गाडय़ा भरभरून आंदोलकांना ताब्यात घेतले. सात हजार लोकांची धरपकड करण्यात आली. सीजेपीचे अभिजित दीपके यांच्यासह सौरव दास व आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातूनच उचलले. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नेहा बोरा यांनाही ताब्यात घेतले. सीजेपीचे नेते वगळता अन्य सर्व आंदोलकांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली. दरम्यान, आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सीजेपीने दिला असून रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा जंतर मंतरवर धडकणार, अशी घोषणाही केली.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांचे लेखी आक्षेप समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. तेव्हापासून ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी आधी निवडणूक आयोग, नंतर जंतर मंतर आणि तिसऱ्या दिवशी राजघाटावर आंदोलन केले. सीजेपीने याच मुद्दय़ावर जंतर मंतर येथे आंदोलनाची घोषणा केली होती. सीजेपीच्या पहिल्या आंदोलनाने धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाचा बळी घेतला होता. त्याचा धसका घेतलेल्या सरकारने जंतर मंतरच नव्हे, तर दिल्लीत येण्यापासूनही आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या मार्गांनी दिल्लीत पोहोचलेल्या आंदोलकांना दिसेल तिथून ताब्यात घेतले. दिवसभरात सहा हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
सीजेपीचे नेते वगळता सर्वांची सुटका
दिल्ली पोलिसांनी दिवसभरात ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली आहे; मात्र सीजेपीच्या नेत्यांना ताब्यातच ठेवले आहे. योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांची सुटका करण्यात येणार आहे.
‘मेट्रो बंद’वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती. सुरुवातीला ही बंदी सायंकळी 6 वाजेपर्यंत होती. मात्र, ती रात्री 10 वाजेपर्यंत वाढविण्यात आली. रात्री 10 वाजल्यानंतर ही मेट्रो स्थानके सुरू करण्यात आली. दरम्यान, मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अजिंक्य शिंदे कोण?
अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अजिंक्य शिंदे मूळचे लातूर जिह्यातील उजनीचे रहिवासी आहेत. ते कॉम्प्युटर इंजिनीयर आहेत. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी घेतली आहे. पुण्यामध्ये आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ते आम आदमी पक्षाशी (आप) जोडले गेले. सध्या ते सीजेपीच्या कोअर टीममधील एक महत्त्वाचे सदस्य आहेत. ऑगस्टमध्ये त्यांच्याकडे सीजेपीच्या राष्ट्रीय संघटन प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सीजेपीच्या ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेचे नेतृत्व शिंदे यांनी केले होते.























































