ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शहांनाही हटवावे लागेल! कॉक्रोच पार्टीने ठणकावले… लढाई सुरू झाली, आंदोलन थांबणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘घोटाळेबाज ज्ञानेश कुमारांना वाचवायचे असे मोदी-शहांनी ठरवूनच टाकले आहे. देशवासीयांनी जी लढाई निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू केली होती, ती आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात झाली आहे. त्यामुळे आता ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शहांनाही जावे लागेल, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीने आज दिला. लढाई सुरू झाली आहे, आता हे आंदोलन थांबणार नाही, असेही सीजेपीने ठणकावले.

ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी शनिवारी दिल्लीत प्रचंड आंदोलन झाले. पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला व सात हजारांहून अधिक आंदोलकांना अटक केली. सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात होते. तब्बल 23 तासांनंतर आज त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर पत्रकार परिषद घेत सौरव दास आणि रांका यांनी मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला.

आणीबाणीलाही मागे टाकले!

‘देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू असून मोदी-शहांनी वातावरण कमालीचे बिघडवून टाकले आहे. आंदोलकांचे अपहरण करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. 1975 च्या आणीबाणीविषयी आम्ही फक्त ऐकले होते. मात्र मागच्या 72 तासांत मोदी-शहांनी त्या आणीबाणीलाही मागे टाकले. 1975 च्या आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नव्हत्या, असे रांका म्हणाले.

आंदोलनाला युद्ध बनवून टाकले!

‘लोकांना शांततेत आंदोलन करून आपले म्हणणे मांडायचे आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांचे ऐकले पाहिजे होते, पण मोदी-शहा इतके घाबरले आहेत की ते ऐकायला तयारच नाहीत. एका ज्ञानेश कुमारसाठी ते लाखो देशवासीयांना त्रास देत आहेत. राजाचा जीव पोपटात आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे. स्वतंत्र भारतात कधीही असे झाले नव्हते. आपल्याच नागरिकांविरुद्ध सरकारने युद्ध पुकारल्याची स्थिती आहे. एक आंदोलन युद्धात रूपांतरित करणाऱ्या मोदी-शहांना लाज वाटली पाहिजे, असा हल्ला सौरव दास यांनी केला.

अटक नाही, माझे अपहरण केले, ध्रुव राठी यांचा गंभीर आरोप

दिल्ली पोलिसांनी मला अटक केली नव्हती, तर माझे अपहरण केले होते. साध्या वेषातील 20 ते 25 पोलिसांनी सकाळी सात वाजता घरात घुसून मला फरफटत नेले,’ असा गंभीर आरोप यूटय़ूबर ध्रुव राठी यांनी आज केला. त्यांना शनिवारी गुरुग्राम येथील घरातून ताब्यात घेण्यात आले होते.

खासदार जॉन ब्रिटास यांचा पोलिसांनी गळा दाबला

‘माकप’चे खासदार जॉन ब्रिटास यांना पोलिसांकडून मारहाण झाली आहे. पोलीस व्हॅनमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ब्रिटास यांनी केला आहे.  ब्रिटास हे मीडियाशी बोलत असताना त्यांना अक्षरशः फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले.