
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शेतजमिनीची सुपीकता टिकवून ठेवत कमी पाण्यावर चांगल्या प्रतीच्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य आहे. शाश्वत शेतीचा हा उत्कृष्ट पर्याय आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, यामध्ये अनियमितता आली आहे. यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे ही काळाची गरज झाली आहे. शाश्वत शेतीचा हा उत्कृष्ट पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
केंद्र सरकारच्या वतीने नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे संभाजीनगरात आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रस्ते वाहतूक जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कर्नाटकचे कृषिमंत्री डी. के. शिवकुमार, फिजीचे जलसंधारण मंत्री डॉ. महेन्द्र रेड्डी, केंद्रीय मानव संसाधनमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, सत्येंद्र जैन, यू. के. सिंग, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अनुप मिश्रा, आर. के. गुप्ता यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्याचे कृषिमंत्री, मान्यवर उपस्थित होते.
कृषी क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता ही सूक्ष्म सिंचनात आहे. त्याचा व्यापक प्रमाणात सर्व शेतकऱ्यांनी स्वीकार करणे आवश्यक आहे. या प्रभावी संकल्पनेचा व्यापक प्रसार, प्रचार करणारी, त्यातील अद्ययावत तंत्रज्ञान, माहितीचे आदान-प्रदान करणारी ही आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद प्रथमच आपल्या देशात त्यातही महाराष्ट्रात होत आहे. याचा आपल्याला विशेष आनंद असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पाण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने सर्वांनीच दक्षतापूर्वक पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर केला पाहिजे. बदलत्या हवामानामुळे पावसाचे वेळापत्रक विस्कटले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या अनियमितेत स्थिरतापूर्वक शेती करणे हे आव्हान आपल्या देशासह जगभरातील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यादृष्टीने कमी पाण्यात अधिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत आणि जमिनीचा कस टिकवून ठेवणे शक्य होते. त्यामुळे सूक्ष्म सिंचनाचा वापर करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून सर्वच शेतकऱ्यांनी शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धती वापरणे हे शाश्वत शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात सर्वत्र पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीतून यशस्वीरित्या बाहेर पडण्यासाठी आमच्या विभागाने सिंचनाला प्रथम प्राधान्य दिले आहे. ठिबक, सूक्ष्म सिंचन हा पाण्याचा कमीत कमी वापर करून चांगले उत्पादन करण्याचा योग्य पर्याय आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांनी देशात चांगले काम केलेले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दोन्ही राज्यांनी कालव्याऐवजी पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठ्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन ही शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्वाची बाब असून त्यादृष्टीने पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांतर्गत राज्यामधील अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने देशातील राज्यांना सिंचन प्रकल्पासाठी अर्थसहाय्य दिले आहे. त्याचप्रमाणे नद्याजोड प्रकल्पासाठीदेखील केंद्रशासन मोठा निधी देत आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी दमणगंगा-पिंजर नदीजोड प्रकल्पाचे पाणी जायकवाडीमध्ये आणण्यात येणार असून या नदीजोड प्रकल्पातील चांगली मदत होणार असून यामुळे जायकवाडी धरणातील ३५-४० टक्के पाणीसाठ्यात वाढ होऊन ८० ते ९० टक्के पाणीसाठा निर्माण होईल. त्यामुळे गोदावरी खोNयाच्या मराठवाडा क्षेत्रातील लोकांना पाणी मिळेल. तसेच तापी नर्मदा नदीजोड प्रकल्प देखील राबविण्यात येणार आहे, असे गडकरी म्हणाले































































