गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी, लोथलमध्ये राज्याच्या आरमारी इतिहासाचे स्वतंत्र दालन

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारल्यानंतर गुजरातमधील लोथलमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचे स्वतंत्र दालन उभारण्यासाठी राज्याच्या बंदर विभागाने 39 कोटी 60 लाख रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्राच्या या निधीतून गुजरातमधील लोथल हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येण्यास हातभार लागणार आहे.

केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाच्या वतीने गुजरातमधील लोथल येथे नॅशनल मेरीटाईम हेरीटेज कॉम्प्लेक्स म्हणजेच राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुस्थानाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये देशातील प्रत्येक राज्याच्या आरमारी वारशाचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राला प्रचंड मोठा आरमारी वारसा आहे. हा वारसा देशासमोर या म्युझियमच्या निमित्ताने देशासमोर नव्याने येणार आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय नौकायनमंत्री तसे बंदरे नौवहन व जलमार्ग मंत्रालयाच्या समितीच्या सदस्यांनी मुंबईचा दौरा केला होता. या दौऱयात या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली.

या बैठकीत लोथलमधील प्रस्तावित राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालयाची माहिती देण्यात आली. या संग्रहालायात महाराष्ट्राच्या आरमाराची माहिती देणारे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या आरमारीची माहिती देणाऱया या स्वतंत्र दालनासाठी राज्याच्या बंदरे विभागाकडून 39 कोटी 60 लाख रुपयंचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येत असलेल्या या संकुलाच्या उभारणीचे काम मार्च 2022 मध्ये सुरू झाले. या संकुलात हडप्पा वास्तुरचनेचे व जीवनशैलीचे दर्शन घडवणारे लोथल मिनी रिक्रीएशन केंद्र, स्मारक थीम पार्क, हवामानविषयक थीम पार्क, साहसी खेळ तसेच मनोरंजन पार्क अशी चार थीम पार्क होणार आहे. यामध्ये जगातील सर्वात अधिक उंचीवरील दीपगृह वस्तुसंग्रहालय, हडप्पा संस्कृतीपासून आजपर्यंतच्या हिंदुस्थानच्या सागरी वारशाचे ठळकपणे दर्शन घडवणारी चौदा दालने तसेच समुद्रकिनारी भागातील राज्याच्या वैविध्यपूर्ण सागरी वारशाचे दर्शन घडवणाऱया ‘कोस्टल स्टेस्ट पॅव्हिलियन’चा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ
लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हा अत्यंत वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यात हिंदुस्थानच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारशाचे दर्शन जगाला घडवण्यात येणार आहे. त्यातून लोथल शहराला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आणण्यासाठी मदत होईल. यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल अशी गुजरात सरकारची योजना आहे.