
अदानी उद्योग समुहाचे संस्थापक गौतम अदानी चांगलेच अडचणीत आले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच त्याचा फटका शेअर बाजार आणि अनेक गुंतवणूकदारांना बसला आहे. आता या मुद्दय़ावरून काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन प्रश्न विचारणार आहे. पंतप्रधानांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी अपेक्षाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. ‘हम अदानी के हैं कौन?’ अशी प्रश्न मालिका काँग्रेस सुरू करत आहे.
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच अदानी यांच्या संपत्तीत अल्पावधीतच मोठी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे तसेच देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.त्यामुळे अदानी नेमके कोण आहेत आणि त्यांची संपत्ती कशी वाढली, या बाबत काँग्रेस पक्ष पंतप्रधान मोदी यांना दररोज तीन प्रश्न विचारणार आहे. ‘हम अदानी के हैं काwन?’ या प्रश्न मालिकेबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून माहिती दिली आहेत. तसेच तीन प्रश्नही पंतप्रधानांना केले आहेत.
अदानी समुहाच्या मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांच्या या मौनामुळेच आम्हाला ही प्रश्न मालिका सुरु करावी लागत आहे, असे जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचे तीन प्रश्न
- गौतम अदानी यांचा भाऊ विनोद याचे नाव पनामा पेपर्स पेंडोरा पेपर्समध्ये आले होते. त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप झाले आहेत. त्यावर आपण काय कारवाई केली?
- ईडी, सीबीआयसारख्या पेंद्रीय तपास यंत्रणा आपण विरोधकांच्या मागे लावता. अदानी समूहाविरोधात गेली काही वर्षे सातत्याने आरोप होत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई केली?
- अदानी यांच्यावर आरोप होऊनही त्यांची चौकशी तर दूरच, पण देशातील विमानतळ आणि बंदरे त्यांना बहाल करण्यात आली आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?




























































