काँग्रेसचा ईडी कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी मोर्चा , आता राज्यभर जेलभरो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने मंगळवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलविल्याने मुंबई काँग्रेसने दुसऱ्या दिवशीही मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणासाठी स्वतः भाजपनेच आपली सत्ता असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना क्लीन चिट दिली होती व हे प्रकरण संपवले होते. मग आता याच नॅशनल हेराल्ड प्रकरणासाठी केंद्रातील भाजप सरकार ईडीमार्फत चौकशीच्या नोटिसा पाठवून हा तमाशा का करत आहेत असा सवाल भाई जगताप यांनी केला.

ईडीतर्फे सलग दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. याविरोधात महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.