चौदाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू; बाणेर भागातील घटना, ठेकेदारावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियोजित गृहप्रकल्पाच्या चौदाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बाणेरमधील पॅन क्लब रस्ता भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात ठेकेदाराच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम ठेकेदार लज्जाराम गुजर, रामकेश गुजर, रवी गवंडे, अजिंक्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर, शाम नेमा रवीदास (वय – 22, रा. नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत देवेंद्रकुमार (वय – 28) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 30 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर एका नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. शाम हा गृहप्रकल्पातील चौदाव्या मजल्यावरील बाल्कनीत फरशी बसविण्याचे काम करत होता. त्यावेळी तो चौदाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

बांधकामाच्या ठिकाणी मजुराच्या सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह चौघांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.